मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. मुंबईत सकाळी थंडी आणि दुपारनंतर भर उन्हात प्रचार केला जातोय. मुंबईतील सर्वांत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला मतदारसंघ म्हणजे वरळी मतदारसंघ. येथे तिरंगी लढत होत आहे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर ठाकरेंच्या शिवसेनेडून आदित्य ठाकरे आणि मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं इथे 'काटे की टक्कर' होणार आहे. तर चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या धामधुमीबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी मिलिंद देवरा यांच्यासोबत खास संवाद साधला.
आदित्य ठाकरेंना टोला : वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुल्यबळ आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते तिथले विद्यमान आमदार आहेत. शिंदेंकडं माझ्या ताकदीचा उमेदवार नव्हता. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला आणि नंतर जे राज्यसभेचे खासदार झाले अशांना आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली. हे शिंदे यांचं अपयश असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "मी इथे आधीही खासदार होतो. मला तळागाळातील आणि सामान्य लोकांचे प्रश्न माहिती आहेत. आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. वरळीतील झोपडपट्टी पुनर्वसन, झोपडपट्टी धारकांच्या समस्या, पोलीस वसाहत, बीडीडी चाळीच्या समस्या, कोळी बांधवांच्या समस्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागील दोन, अडीच वर्षात सोडवल्या आहेत. मग तेथील स्थानिक आमदारांना या समस्या यापूर्वी का सोडवता आल्या नाहीत?" असा सवाल मिलिंद देवरांनी उपस्थित केला". "त्यांनी जी टीका केलीय त्यावर मला काही जास्त बोलायचं नाही. परंतु प्रचारात मला वरळीकर उत्तम प्रतिसाद देत आहेत. वरळीकर माझ्या बाजूनी कौल देतील," असा विश्वास मिलिंद देवरांनी व्यक्त केला.
मच्छीवरुन टीका : दुसरीकडं मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी पोस्ट करत 'मलबार हिलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला मच्छीचा वास येतोय तर तो कोळीवाड्याचा काय विकास करणार?' असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत देवरांना विचारलं असता, "हे बघा! कोण काय खातंय आणि कोण काय खात नाही यावरून कुठल्याही मतदारसंघाचा विकास होत नाही. मी स्वतः मच्छी खोतो त्यामुळं वासावरून मी कधीही नाक मुरडलं नाही. मात्र, मनसेचे उमेदवार काय बोलले हे मला माहिती नाही. पण एक सांगतो, जर मी निवडून आल्यानंतर आमदार म्हणून वरळीतील समस्या आणि कोळीवाड्याचा नक्कीच विकास करणार. आणि मला वरळीकर जिंकून देतील."
वरळीच्या समस्यांना प्राधान्य देणार : "वरळीतील विद्यमान आमदार वरळीकरांना खूप कमी वेळा भेटतात. वरळीकरांच्या समस्या अजूनही तशाच आहेत. यामध्ये बीडीडी चाळींचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन, कोळी बांधवांचा प्रश्न तसेच पोलिसांच्या भाड्यांच्या घरांचा प्रश्न आहे. महायुती सरकारनं मुंबईसह राज्यात अनेक कामं केली. वरळीत तुम्ही मला संधी दिला तर मी नक्कीच वरळीचा कायापालट करेन," असा विश्वास मिलिंद देवरा यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून व्यक्त केला.
हेही वाचा -