पुणे Shivajirao Adhalrao Patil : शिरुर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांना आता शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबाबत आढळराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, " शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच आमदार असल्यानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली.
शिवाजीराव आढळराव म्हणाले, " राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जात असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ठरवलं की या मतदारसंघात सहमतीचा उमेदवार म्हणून मला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात यावी. त्यामुळे मला ती उमेदवारी देण्यात आली. माझ्या पक्ष बदलाबाबत अनेक टीका झाली. पण तेव्हा एक आगळा-वेगळा प्रयोग झाला. महायुतीच्या एका घटकातून दुसऱ्या घटकात मी प्रवेश करत होतो. तेव्हा माझ्या मूळ पक्षाच्या मुख्य नेत्यांनीच मला परवानगी दिली की, तुम्ही प्रवाहात राहण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करा आणि तिथून निवडणूक लढवा." असं यावेळी आढळराव पाटील म्हणाले.
अमोल कोल्हे खोटं बोलत आहेत : यावेळी आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांनी मागच्या 5 वर्षात केलेल्या कामाच्या बाबतीत विचारलं असता ते म्हणाले की," बैलगाडा शर्यतीचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. सर्वांना माहीत आहे की बैलगाडा शर्यतीसाठी मी काय केलंय. 2005 साली बंदी तेव्हापासून मी लढा देत आहे. 42 गावात बैलगाडा शर्यतीसाठी घाट बांधणारा मी एकमेव आहे. आता काही लोक त्याचे श्रेय घेत आहे. तसंच पुणे-नाशिक हायवेसाठी 2008 पासून मी संघर्ष करत आहे. बोलण्याची कला तसंच देवानं चांगल तोंड दिल्यानं कोल्हे हे खोटं बोलत आहेत," असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला. कांद्याच्या निर्यात बंदीबाबत आढळराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, यातदेखील मी अनेक वेळा खासदार असताना भाषण केलं आहे. कांद्याचा विषय कोल्हे यांनी फक्त निवडणुकीसाठी घेत राजकारण केल्याचा आरोप यावेळी आढळराव पाटील यांनी केला.
आम्ही आमच्या जागेचा कोटा पूर्ण करणार : पुढे शिरुर लोकसभेचे उमेदवार म्हणाले, " निवडणुकीत जागेची अदलाबदल होऊ शकते. पण आम्ही आमचा कोटा पूर्ण करणार आहोत. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची चर्चा आहे. पण तिथंदेखील आमचाच उमेदवार असणार असल्याचं यावेळी शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी सांगितलंय." पुण्यात शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आमदार भरत गोगावलेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा :