मुंबई Shinde Group MLA Fight : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (1 मार्च) पाचवा आणि शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावरच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शंभुराज देसाई नेमकं काय म्हणाले? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भुसे-थोरवे यांच्यात कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला. तसंच दोघांमध्ये धक्काबुक्की झाली याचा पुरावा काय? असा सवालही शंभूराज देसाई यांनी केला.
विधिमंडळाच्या लॉबीत काय घडलं : विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या घटनेची माहिती देत शंभूराज देसाई म्हणाले, "दादा भुसे आणि महेंद्र थोरवे हे विकास कामावरून बोलत होते. यावेळी त्यांचा आवाज वाढला. पण त्यांच्यात हाणामारी किंवा धक्काबुक्की असं काहीच घडलं नाही. बोलताना केवळ आवाज वाढला म्हणजे वाद म्हणता येणार नाही. यावेळी मी हस्तक्षेप करत दोघांची समजूत काढली. त्यामुळं कोणताही वाद झाला नाही".
विकासकामांच्या निधीवरून झाला वाद? : एकीकडं शंभूराज देसाई यांनी भुसे-थोरवे यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडं विकासकामांच्या निधीवरून भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या लॉबीत आज मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विकास कामावरून बोलणं सुरू होतं. आमच्या मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य दिलं जात नाही, निधी दिला जात नाही, तसंच दुर्लक्ष केलं जातंय अशी व्यथा महेंद्र थोरवे यांनी भुसे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर संवादादरम्यान दोघांचाही आवाज वाढला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसंच यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली, असं सांगितलं जातंय. मात्र, असं असलं तरी विधिमंडळाच्या लॉबीत नेमकं काय घडलं होतं? हे दादा भुसे अथवा महेंद्र थोरवे यांच्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा -