सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि राज्यातलं 50% आरक्षण 75% टक्केपर्यंत करावं, असं शरद पवार म्हणालेत. ते सांगलीत बोलत होते.
संसदेत विधेयक आणावं : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार म्हणाले, "50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण जर हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरूस्ती केली पाहिजे. दुरुस्ती करायला काय हरकत आहे? आता 50 टक्के आरक्षण आहे ते 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या. महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही? म्हणजे आता 50% आहे, 75% होण्यासाठी केवळ 25 नं वाढवावं लागेल. 25% वाढवलं की ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल. जिथं कमी आहे त्यांच्याबद्दलही विचार करता येईल. यामध्ये केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन संसदेत विधेयक आणावं. आम्ही त्यांना साथ देऊ", असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण योजनेवरुन टीका : यावेळी लाडकी बहीण योजनेवरुन टीका करत पवार म्हणाले, "राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेवर पैसे खर्च करण्यात येत आहेत. मात्र, त्याचा परिणाम राज्यातील आरोग्य सेवेवर झालाय. अनेक रुग्णालयांच्या योजनेची बिलं थकलेली आहेत. माझ्याकडं सांगलीमधील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न आलेला आहे. ज्यांच्या हॉस्पिटलची बिलं राज्य सरकारकडून थकल्याचं सांगण्यात आलंय."
प्रकाश आंबेडकरांना लगावला टोला : यावेळी शरद पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. "लोकसभा निवडणुकीत ज्यांना एकही जागा मिळाली नाही, ते लोक माझ्यावर बोलतात. त्यांचं भाष्य प्रसिद्धीसाठी असतं", असं पवार म्हणाले.
हेही वाचा -