नवी दिल्ली NCP Sharadchandra Pawar : निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला बुधवारी सायंकाळपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सादर करण्यास सांगितलं होतं. यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव दिलंय. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळालं आहे. मात्र, पक्षाच्या चिन्हावर अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
कोणती दिली होती तीन नावं : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. यानंतर शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. यातून निवडणूक आयोगानं 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव शरद पवार गटाला दिलंय. शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला, त्यातील राष्ट्रवादी हे नाव आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे मिश्रण या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळं या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेल्याचं पाहायला मिळतंय.
निवडणूक आयोगानं काय दिला होता निर्णय : शरद पवार विरुद्ध अजित पवार गट खटल्यात निवडणूक आयोगानं 147 पानांचे आदेश दिले आहेत. या आदेशात आयोगानं दोन्ही गटांच्या सर्व मुद्द्यांचं आणि पुराव्यांचं विश्लेषण केलंय. आयोगानं सर्व कागदोपत्री पुराव्यांचं विश्लेषण केलं असून, अजित पवार यांच्या गटाचं पक्ष आणि संघटनेवर वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या गटातील लोकही जास्त आहेत. त्यामुळं अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही देण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलंय.
कुठे जल्लोष तर कुठे निषेध : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर एकीकडे अजित पवारांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे समर्थक या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहेत. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले होते. तेव्हापासूनच हा सर्व वाद सुरू होता. अखेर बुधवारी यावर निवडणूक आयोगानं निकाल दिलाय.
हेही वाचा :