ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे ठाण्यात मंगळवारी रात्री आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये जाऊन छत्रपती शाहू महाराज यांना पाडण्यासाठी शंभर कोटी रुपये वाटत असल्याचा गंभीर आरोप केला.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचं काम ठाण्यातील नेत्यांपासून सुरू झालं. यामुळे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ठाण्यात येऊन महायुतीवर आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर टीका करत चांगलाच समाचार घेतला. खासदार राऊत म्हणाले, "ठाण्यातील उमेदवाराला प्रचाराचीदेखील गरज नाही. कारण ठाण्यातील नागरिक सुज्ञ असून ते गद्दारीला क्षमा करणारे नाहीत. ठाण्यातील नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितलं होतं, गद्दारीला क्षमा नाही. अशाच रीतीने गद्दारी करणाऱ्या या सर्वच सरकारमधील आमदारांना नागरिक क्षमा करणार नाही," अशा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी हे पांढऱ्या पायाचे - "नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून त्यांनी देशाचं वाटोळं केलं आहे. देशातील अनेक महिलांचे मंगळसूत्र भाजपामुळे मोडावा लागला असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये काहीही समजत नसलं तरी पुनर्वसन केले," असा आरोप राऊत यांनी केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमावर कब्जा- "शिंदे गटाच्या नेत्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमावर कब्जा करून तेथे आपला बोर्ड लावलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची ही एकमेव संपत्तीदेखील शिंदे गटातील नेत्यांनी बळकवली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी चिठ्ठी पाठवून केलेल्या मागणीची पूर्तता बाळासाहेबांनी केली होती,"अशी आठवणदेखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितली.
14 जूनला काय घडलं- "14 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे हे माझ्या रूमवर येऊन आपल्याला बदल करायचा आहे, असे सांगत होते. तेव्हा कसला बदल? कशाला बदल? असं विचारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत असल्याचं सांगितलं. या वयात मला तुरुंगात जाणं शक्य नाही, असं त्यांनी म्हटलं होते, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. वेगवेगळ्या मार्गाने कमावलेले कोट्यावधी रुपये कसे वाचवायचे? या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली," असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा-