मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केलीय. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतलाय.
उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांत: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. जानकर यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. महायुतीच्या जागा वाटतात महादेव जानकर यांच्या पक्षाला विचारात घेतलं नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितलं जातंय. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसात जाहीर होणार असून, त्यात महादेव जानकर यांच्या पक्षाचा विचार केला गेला नाही. या कारणाने नाराज झालेल्या जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. जानकर यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीसुद्धा दोन दिवसात जाहीर होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
जानकर यांची एक्झिट महायुतीसाठी धोक्याची घंटा : गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये योग्य तो सन्मान भेटत नसल्याने नाराज असल्याची माहिती आहे. जानकर यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी ४० ते ५० जागांची मागणी केली होती. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या कारणामुळेच अखेर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आज मुंबईत झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही महादेव जानकर उपस्थित नव्हते. महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडल्याने महायुतीने आपला पहिला मित्रपक्ष गमावलाय. राज्यातील धनगर समाजाचा मोठा पाठिंबा महादेव जानकर यांना आहे. सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना, मराठवाड्यातील काही भाग आणि कर्नाटकलगतच्या प्रदेशातसुद्धा त्यांची मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत महायुतीतून महादेव जानकर यांची एक्झिट ही महायुतीसाठी फार मोठी डोकेदुखी ठरणारी आहे.
लोकसभेत झाला होता पराभव : आता झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जाण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चाही सुरू केली होती. परंतु अखेरच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीने महादेव जानकर यांच्यासाठी परभणी लोकसभेची एक जागा सोडली होती. परंतु तेथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.
हेही वाचा-