पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष त्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून बैठका घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे.
राहुल गांधी निवासस्थानी घेणार बैठक : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक पूर्ण गांभीर्यानं लढविण्याचं ठरविलं असून त्यासाठी राहुल गांधींनी तयारी सुरू केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी उद्या सोमवार (14 ऑक्टोबर) रोजी बैठक बोलावली आहे.
बैठकीला 'हे' नेते राहणार उपस्थित : राहुल गांधी यांच्या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना निमंत्रित केलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत होणारी हि बैठक महाराष्ट्र काँग्रेससाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वपूर्ण बैठक : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना प्रामुख्यानं काँग्रेसची भूमिका काय असणार? तसंच कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार? याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा