कोल्हापूर Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यामुळं दोन्हीही मतदारसंघात महाविकासआघाडी आणि महायुतीकडून प्रचाराचं रानं उठवलं जातय. खास करून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे शिवछत्रपती आणि राजर्षी शाहूंच्या गादीचे वंशज असल्यामुळं प्रचारात गादीवरून सोशल मीडियावर सध्या अनेक पोस्ट आणि मिम्स व्हायरल केल्या जात आहेत. शनिवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 'भीती गादीची म्हणून सभा मोदींची', या आशयाचे संदेश महाविकासआघाडीकडून पसरवले जात आहेत. तर 'मान गादीला मात्र मतं मोदींना' अशा पोस्ट महायुतीकडून व्हायरल केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गादी आणि मोदींवरुन कोल्हापुरात सध्या सोशल मीडियावर धुमशान सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतय.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात 'मान गादीला मात्र मत मोदींना' या टॅगलाईन खाली प्रचार करण्यात आला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात सातारा लोकसभेचा कित्ता गिरवला जात आहे. महायुतीकडून 'मान गादीला मात्र मतं मोदींना' या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, तर महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 'भीती गादीची म्हणून सभा मोदींची' या आशयाचे हॅशटॅग व्हायरल केले जात आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा कोल्हापूरची गादी केंद्रस्थानी आली असून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानात कोल्हापूरकर कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकतात? यावरूनच 'गादी की मोदी' याचा निकाल स्पष्ट होणार आहे.
महायुती आणि महाविकासआघाडीकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. शाहू महाराज यांच्यासाठी राजघराण्यातील सदस्य प्रचार करत आहेत. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या खांद्यावर आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार सतेज पाटील शाहू महाराजांसाठी दुर्गम भागात प्रचाराचं लोण पसरवत असल्याचं बघायला मिळतं. तर आमदार पी एन पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गुलाल लागावा यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार करत आहेत.
उद्या पंतप्रधान मोदींची तोफ कोल्हापुरात धडाडणार : जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे उद्या (27 एप्रिल) सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा दलाने मैदानाचा ताबा घेतलाय. यासह कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
हेही वाचा -
- "शाहू महाराज खरे वारसदार नाहीत"; संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सतेज पाटलांनी घेतला समाचार - lok sabha election 2024
- महाराष्ट्रातून दोन छत्रपतींचे वंशज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात; राजघराण्यांना राजकीय पक्ष का करतात जवळ? - Lok Sabha Election 2024
- खरा हिंदुत्ववाद काय? शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्ट सांगितलं! - Shahu Maharaj News