मुंबई Pandurang Sakpal Passed Away : शिवसेनेचे (ठाकरे गट) कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांचं वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. तसंच त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी (25 मे) सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी गिरगावातील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान, पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळं ठाकरे गटावर शोककळा पसरलीय.
झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला : पांडुरंग सकपाळ हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनानंतर राऊतांनी एक्सवर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. "पांडुरंग सकपाळ...धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्यानं विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला, अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला, तुरुंग भोगला. पण पांडुरंग मागे हटला नाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला", असं राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.
कोण होते पांडुरंग सकपाळ? : दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती. मुंबईतील कुलाबा भागातून सपकाळ हे नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ दक्षिण मुंबईतून शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख म्हणून काम पाहिलं. मात्र, मागील वर्षी त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर अंतर्गत गटबाजीचीही चर्चा रंगली होती. 2019 मध्ये त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. अजान स्पर्धा आयोजित केल्यामुळं पांडुरंग सकपाळ यांच्यावर बरीच टीका झाली होती.
हेही वाचा -
Pandurang Sakpal : ठाकरे गटात खांदेपालट! पांडुरंग सकपाळ यांना विभाग प्रमुख पदावरून हटवले