सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024 : भाजपाचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असं मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणं करू नका. नांदा सौख्यभरे! असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भाजपाच्या संघटनात्मक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे बोलत होते.
अबकी बार चारसो पार : उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले, हा मेळावा पक्ष हितासाठी आहे. मोदीजींनी कार्यकर्त्यांना जी हाक दिलीय, अबकी बार चारसो पारचा जो संकल्प आहे, तो पूर्ण करण्यासाठी हा मेळावा आहे. आपलं काम लोकहिताचं होतं की नाही ते या निवडणुकीत कळणार आहे. मी आताच कोअर कमिटीची बैठक अटेंड करून आलोय. सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, असं मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे! असं आवाहन, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केलंय.
उद्धव ठाकरे केली टिका : राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. अजून महायुतीचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे, तरी का घाबरता एवढे? असा सवाल राणे यांनी महाविकास आघाडीला केलाय. 1989 नंतर जिल्ह्यात विकासाचा कोणता प्रकल्प विरोधकांनी आणला ते सांगा, असे विचारून नारायण राणे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील टीका केली. बौद्धिक आणि विकासात्मक बोला. कणकवलीचा एक माणूस केंद्रात मंत्री आहे याचे विरोधकांना आणि पत्रकारांना कौतुक नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचाच खासदार : विद्यमान खासदार विनायक राऊत म्हणजे शेतातले बुजगावणे असल्याची टीका राणे यांनी केलीय. काही झालं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपाचाच खासदार असेल असं, राणे यांनी ठामपणे सांगताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एका सुरात होकार देत त्यांना प्रतिसाद दिला. कोणाला गणपती बनवावे, कोणाला हनुमान बनवावे हे कार्यकर्त्यांच्या हातात आहे. तुम्ही माझे सवंगडी आहात. मला तुमचा अभिमान आहे. भाजपा आणि मोदींचं कार्य या जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत घेऊन जा, असं आवाहन, राणे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
दोघेही बाप-बेटे जेलमध्ये जाणार : कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत औषधाचा घोटाळा उबाठाच्या नेत्यांनी केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला. याप्रकरणी लवकरच दोघेही बाप बेटे जेलमध्ये जातील असं सांगितलं. लोकांपर्यंत जा, मोदींना मत द्या. मोदींमुळं भारत विकसित देश होणार आहे. त्यामुळं मोदींचे हात बळकट करण्यासाठी, अबकी बार चारसो पारसाठी येथे भाजपाचा खासदार हवा असं राणे यांनी शेवटी सांगितलं.
हेही वाचा -
- भाजपाच्या दबावामुळं शिवसेनेत अंतर्गत नाराजी? एकनाथ शिंदेंसमोर दुहेरी संकट - LOK SABHA ELECTION 2024
- निवडणूक लढवायची की नाही हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा प्रश्न; रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा - दीपक केसरकर - Lok Sabha Election 2024
- एक खासदार पडला तर फरक पडत नाही, रायगडचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक - LOK SABHA ELECTION 2024