मुंबई : भाजपाने २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत जागा वाटपात आघाडी घेतली. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा वाटपात आघाडी घेतली होती. भाजपाने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून ३ दिवस उलटले तरीसुद्धा, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं हा विषय महाविकास आघाडीसाठी चिंतेचा बनलाय. अशात शरद पवार यांनी जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार जरी घेतला असला तरी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.
विदर्भातील १२ आणि मुंबईतील ५ जागा : २२ ऑक्टोंबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा सुटला नसल्यानं, महाविकास आघाडीसाठी हा फार मोठा चिंतेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आणि त्याचा फायदाही त्यांना दिसून आला. परंतु, आता अनेक दिवसापासून जागा वाटपावरून बैठकांचं सत्र मुंबई ते दिल्लीत सुरू असूनही हा घोळ अद्याप कायम आहे.
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेत रस्सीखेच : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे जागावाटपावर सातत्यानं भाष्य करत आहेत. २८८ जागांपैकी २१० जागांवर सहमती झाल्याचं सांगण्यात आलं असलं तरी, सुद्धा उर्वरित जागा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीच्या ठरल्या आहेत. विशेष करून विदर्भातील १२ जागा आणि मुंबईतील ५ जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याने जागा वाटपाचा गुंता वाढला आहे.
मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची लालसा : महाविकास आघाडीने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा ही उद्धव ठाकरे यांची आग्रही मागणी शरद पवार आणि काँग्रेसने हे फेटाळून लावल्यानं उद्धव ठाकरे नाराज आहेत. अशात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची लालसा लपून राहिलेली नाही. तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसला असल्यानं कमी आमदारांच्या संख्याबळावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनता येणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असून विदर्भातील आणि मुंबईतील जागांवर वाद सुरू आहे.
विलंब धोक्याची घंटा : महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत राजकारणातले चाणक्य समजले जाणारे, शरद पवार यांच्या करिष्म्याने आणि उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या सहानुभूतीनं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश संपादित करता आलं. परंतु, त्यानंतरच्या पाच महिन्यात महायुतीनं अनेक लोकपयोगी योजनांचा भडीमार राज्यात केला. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही महायुतीसाठी वरदान ठरणारी अशी योजना असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशात महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आणि जागावाटपास होणारा विलंब महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे.
हेही वाचा -