मुंबई Lok Sabha Election : मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी प्रचार जोरात सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून पक्षांकडून वेगवेगळे आमिष दाखवली जात आहेत. विरोधकांनी संजय पाटील यांच्या नावानं डमी उमेदवार उभे करण्यात आले. मात्र विरोधकांची ही चाल लक्षात आल्यानं पुन्हा एकदा ते ‘खोटे’च ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
विरोधकाकडून रडीचा डाव : ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील म्हणाले, "पराभव करण्यासाठी विरोधक रोज नवनवीन कारनामे करत आहेत. मतांचं विभाजन करण्यासाठी संजय पाटील नावाचे चार डमी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोघांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. खोटे काम करण्यासाठी खूप मेहनत करुन सांगली, नवी मुंबई व शिवाजी नगर भागातून चार संजय पाटील यांनी शोधुन आणले. त्यापूर्वी एकाच व्यक्तीनं नवी मुंबई, वाशी या स्टॅम्प वेंडरकडून एकाच सिरीयलचे चार स्टॅम्प पेपर विकत घेतले. एकाच दिवशी, एकाच सहीनं, एकाच ठिकाणाहुन घेतलेले हे स्टॅम्प पेपर या चारही उमेदवारांना देऊन त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरुन घेण्यात आला. मात्र विरोधकांचा हा डाव उलटला. सांगलीचे संजय महादेव पाटील व नवी मुंबई घनसोलीचे संजय पांडुरंग पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. तर नवी मुंबई पावनाचे संजय निवृत्ती पाटील आणि मुंबई शिवाजी नगर भागातील संजय बंडू पाटील यांचे अर्ज स्विकारण्यात आले. मात्र जनतेनं ही विरोधकांची खेळी ओळखली असून आपला विजय निश्चित आहे."
पराभव दिसू लागल्यानं असे उद्योग : " स्वर्गीय दिना पाटील यांचा मुलगा म्हणून अख्खी ईशान्य मुंबई मला ओळखते. मी यापूर्वीही खासदार म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. माझं नाव आणि माझं काम इथल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. शिवसेनेचे स्थान मराठी माणसाच्या हृदयात आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे. कधी दगडफेक तर कधी मिनी पाकिस्तान, बांग्लादेश तर कधी मोदी मोदी करुन बघितलं. परंतु, आम्हाला जो मिळणारा प्रतिसाद आहे, ते बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे," असं संजय दीना पाटील यांनी म्हटलंय. विरोधकांना आतापासूनच त्यांचा पराभव दिसू लागल्यानं ते आता असले उद्योग करायला लागले आहेत."
मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र- पुढे संजय दीना पाटील म्हणाले, " पराभवाच्या भीतीनं मिहिर कोटेचा यांना घाम फुटलाय. याच भीतीनं त्यांनी आधी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण इथल्या सुज्ञ नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. आता त्यांनी मतदारांना गोंधळात पाडण्यासाठी माझ्याच नावाचे आणखी 4 डमी उमेदवार उभे केले आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे, त्यातले 3 डमी उमेदवार तर या मतदारसंघातलेच नाहीत. मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र स्थानिक मतदारांना पुरतं समजलं आहे. ईशान्य मुंबईतील लाखो मतदार शिवसेना, महविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आमच्या प्रचाराला सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. भाजपानं निर्माण केलेला खोटारडेपणाचा अंधकार मिटवण्यासाठी आमची शिवसेनेची 'मशाल' प्रत्येक घरात पोहोचली आहे. यामुळं भाजपाला आपला पराभव दिसू लागल्यानं हे यांना धंदे करत आहेत,"अशी घणाघाती टीका संजय दिना पाटील यांनी विरोधकांवर केली.
हेही वाचा :