पुणे MLA Nilesh Lanke : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर आमदार लंके हे अजित पवार गटात गेले होते. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. पुण्यात शरद पवार यांच्या कार्यालयात लंके हे प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोल्हेंनी केली होती मनधरणी : गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. तसंच अहमदनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचा प्रयोगदेखील झाला. तिथं कोल्हे यांनी लंके यांची मनधरणी केली होती. आता लंके हे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय.
लोकसभेतची उमेदवारी मिळणार : निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळं त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. ते भाजपाच्या सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवार असू शकतात.
लंकेंनी तातडीनं भूमिका घ्यावी : निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश घेण्याच्या चर्चांवर आमदार रोहित पवार म्हणाले, "पुरोगामी विचार सोडून गेलेल्यांवर जनतेत चीड आहे. लंकेंनी एक-दोन आठवडे असं करू नये. जी भूमिका घ्यायची ती तातडीनं घ्यावी. त्यांचं स्वागत असेल. नीलेश लंके जिथे जातात, तिथे त्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आहे. त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. ते येत असतील, त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागत आहे. फुले शाहू आंबेडकरांचे व पुरोगामी विचार सोडून गेलेलेल्या व्यक्तींच्या बाबतजनतेच्या मनात राग आहे. नीलेश लंके यांनी एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही. जी भूमिका घ्यायची ती तातडीनं घ्यावी." दरम्यान लंकेंच्या प्रवेशाबाबत शरद पवारांनी काही माहिती नसल्याचं सांगितलंय.
हेही वाचा :