मुंबई Manohar Joshi Award : माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिवसेनेतील एक अभ्यासू, मनमिळाऊ, मृदुभाषी अशी त्यांची ओळख होती. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मनोहर जोशी यांच्या निधनानं राजकारणातील एक अभ्यासू नेता हरवल्याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसंच 'लवकरच राज्य शासनातर्फे मनोहर जोशी यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करणार' असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? : यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचे निधन ही आमच्यासाठी दुखःद घटना आहे. खरंतर त्यांची तब्येत खालवल्याची बातमी कळली त्याचवेळी मी जोशी सरांना रूग्णालयात भेटायला जाणार होतो. मात्र, त्या आधीच ही दुखःद बातमी मिळाली. जोशी सरांचं बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा होती. एक अभ्यासू, संयमी आणि शिस्तीचा नेता अशी त्यांची ओळख होती. आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो. बाळासाहेबांचा उजवा हात, अशी त्यांची ओळख होती."
'कोहिनूर' हिरा गमावला : पुढं ते म्हणाले की, "जोशी सर सामान्य घरात जन्माला आले. पण त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यामुळं त्याचे कष्ट, मेहनत आम्ही जवळून पाहिलेत. बाळासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा एक 'कोहिनूर' हिरा आम्ही गमावलाय. अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात. त्यांचं नेतृत्व कौशल्य आम्ही पाहिलंय. संघटना कशी वाढवावी, माणसं कशी जोडून ठेवावी हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांची वक्तृत्व शैलीदेखील उत्कृष्ट होती. त्यामुळं भविष्यात जोशी सरांसारखे नेते तयार व्हावे, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मनोहर जोशी सरांच्या नावानं एक पुरस्कार सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. येत्या काळात त्याची घोषणा केली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना."
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जोशी सर जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा मी नागपूरचा महापौर होतो. युती सरकारच्या काळात आमचा स्नेह चांगला होता. त्यावेळी मला त्यांचे मार्गदर्शन लाभले हे मी माझे भाग्य समजतो."
राजकीय नेत्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन : बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेतील माजी महापौर ते आमदार, विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री आणि खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याच्या निधनावर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केलाय. दादर येथील मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज ठाकरे या नेत्यांनी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
हेही वाचा -
- गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात
- "संकटकाळातही बाळासाहेबांच्या सोबत असणारे एकनिष्ठ शिवसैनिक"; मनोहर जोशींना उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली, बुलडाणा दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना
- मनोहर जोशींच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली