मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार (15 डिसेंबर) रोजी दुपारी नागपुरात होत आहे. त्यामुळं शनिवारी (14 डिसेंबर) रोजी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी 'सागर' या शासकीय निवासस्थानी सकाळपासूनच गर्दी केली होती. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे, संजय राठोड, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके, राहुल आवाडे या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिपदाच्या शर्यतीत इच्छुक असलेल्या आमदारांनी मोठी लॉबिंग सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सागर निवासस्थानी इच्छुकांची गर्दी : मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या 15 डिसेंबर रोजी दुपारी नागपूर येथे होणार असल्याची माहिती आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला पाठवल्याची माहिती आहे. यासोबतच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या भावी मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस हे स्वतः फोन करणार आहेत. असं असलं तरी अनेक माजी मंत्र्यांचे पत्ते कापले जाणार आहेत. याकरता मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू असून देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शनिवारी नेत्यांची रीघ लागली. आमदार संतोष दानवे, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रकाश सोळंके, राहुल आवाडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
केसरकर, राठोड, सावंत, सत्तार यांना विरोध : दुसरीकडे, मंत्र्यांचा शपथविधी रविवारी ठरला असला तरी महायुतीत खाते वाटपावरून अद्यापही एकमत झालं नसून अनेक खात्यांवर रस्सीखेच सुरू आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी गृह आणि महसूल खात्यासह विधानपरिषद सभापती पदाची मागणी केली आहे. त्यातच मंत्रिपदासाठी इच्छुक शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची भेट एकनाथ शिंदे यांनी नाकारली. या दोन्ही नेत्यांना 5 तास भेटीसाठी ताटकळत ठेवून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेट दिली नसल्यानं मंत्रिमंडळात संधी मिळावी, यासाठी या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनधरणी केल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी मोठा विरोध होत आहे.
गिरीश महाजन यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद : दुसरीकडे, भाजपाकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी त्यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. भाजपाचे संकट मोचक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेले गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपाच्या गळाला लावण्यात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कारणानं गिरीश महाजन यांच्याकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व राहण्यासाठी भाजपानं नवीन रणनीती आखली असून त्या अनुषंगानं गिरीश महाजन यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली जाऊ शकते.
हेही वाचा