मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जागावटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अनेक ठिकाणी अडलं असताना भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटानं) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही उमेदवारांची यादी जाहीर केलीय. तर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची लवकरच यादी जाहीर होणार आहे. निवडणुका जवळ आल्यानं नाक्या नाक्यावर, गल्ली-बोळात, बस, ट्रेनमध्ये सर्वत्र निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 26 नोव्हेंबरला राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाचं सरकार येणार? हे स्पष्ट होईल. लवकरच प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रामुख्यानं कोणकोणते मुद्दे असणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
प्रचारात विरोधकांचे मुद्दे कोणते असणार? : एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये मूळ शिवसेनेतून बाहेर पडत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. वर्षभरानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. गेल्या अडीच वर्षांत महायुतीचं सरकार आहे. या सरकारच्या काळात राज्यातील अनेक उद्योग परराज्यात गेले असा आरोप झाला. त्यामुळं उद्योग आणि रोजगार हे महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या केंद्रस्थानी असतील. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार असून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असतील. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळं वाढती बेरोजगारी, वाढती गरिबी यावरुन विरोधक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, घोटाळे, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ झालीय. बदलापूर अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळला, याही मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, वरील मुद्द्यांवरून विरोधक प्रचारात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याच्या तयारीत आहेत.
प्रचारात सत्ताधाऱ्यांचे मुद्दे कोणते? : गेल्या दोन-अडीच वर्षापासून राज्यात महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात अनेक उद्योगधंदे आले, असं सरकार वारंवार दावा करत आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यातील अनेक उद्योगधंदे हे गुजरात तसंच अन्य राज्यात गेल्याचं वास्तव नाकारता येत नाही. दरम्यान, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट, कृषी वीज बिलमाफ, कौशल्य योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विविध समाजासाठी महामंडळाची स्थापना, आदी मुद्दे हे सत्ताधाऱ्यांकडून प्रचारात आणले जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकारची महत्त्वकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळं राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल, असा विश्वास महायुतीतील नेत्यांना आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा केले, हे सातत्यानं प्रचारात सांगितलं जाण्याची शक्यता आहे. यासह लेक लाडकी योजना, सरकारनं वाढत्या गुन्हेगारीला आळा घातला, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आळा घातला, विशेष म्हणजे अनेक लोक कल्याणकारी योजना, विविध पायाभूत सुविधा, मेट्रो, अटल सेतू अशा विकासकामांचा पाढा महायुतीतील नेते प्रचारात वाचण्याची शक्यता आहे.
योजनांचा फायदा? की विरोधक भारी पडणार? : "येत्या काही दिवसांतच प्रचाराच्या फैरी झडणार आहेत. एकीकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरची गर्मी आणि दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपामुळं राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे. "प्रचार फेऱ्यांमध्ये विरोधक महिला अत्याचार, महागाई, वाढती बेरोजगारी, उद्योगधंदे, कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार, घोटाळा आदी मुद्द्यावरून आक्रमक होत सरकारला घेरण्याच्या तयारीत असतील. सरकार कुचकामी आहे, हे जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतील. तर दुसरीकडे सरकारनं विविध लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यात आरोग्य योजना, तीर्थ योजना, विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळं अडीच कोटींच्यावर राज्यातील महिलांना याचा फायदा झाला असून, या महिला लाभ घेताहेत. मुख्यत: लाडकी बहिण योजनेचा मुख्य मुद्दा सत्ताधाऱ्याकडून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना कशी फायदेशीर ठरली, हे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जाणार आहे," असं राजकीय विश्लेषक वैजयंती कुलकर्णी-आपटे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलतना सांगितलं.
आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळणार : "महिला अत्याचार हे पूर्वीच्या सरकारमध्येही होत होते. पण आता याचा गवगवा होऊन, मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत. काही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा विरोधक मागताहेत. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळं अनेक महिलांना याचा फायदा झाला. मात्र, लाडक्या बहिणी महायुतीला मतं किती देतात किंवा याचं मतात किती रुपांतर होतं हे निकालातूनच स्पष्ट होईल. प्रचार फेरीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा मात्र जोरात पाहायला मिळणार," अशीही प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक वैजयंती कुलकर्णी-आपटे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
हेही वाचा