मुंबई Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बुधवारी बैठक झाली. यात 12 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित जागा निश्चित करण्यासाठी आज बैठक सुरू आहे.
सिल्व्हर ओक येथील बैठकीला कोण उपस्थित आहेत?
- महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. ठाकरे गटाचे नेते अनंत गीते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
- सिल्व्हर ओक येथील बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.
बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रातील 18-19 जागांवर आपण चर्चा केलीय. यातील 12 जागा निश्चित झाल्या आहेत. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. त्यात अंतिम चर्चा होऊन उद्या किंवा परवा सर्व जागांचे उमेदवार जाहीर केले जातील. सीईसीच्या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीला समितीचे सदस्य राहुल गांधी उपस्थित नव्हते."
- महाविकास आघाडी अबाधित : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या यादीच्या घोषणेवर पक्षाचे नेते रमेश चेन्निथला म्हणाले की, "आम्ही काही जागा जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडी (MVA) अबाधित आहे. आम्ही सर्व एकत्र निवडणुकीला सामोर जाणार आहोत."
आतापर्यंत 82 उमेदवारांची घोषणा : "काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील उमेदवारांच्या यादीवर बुधवारी चर्चा झाली. उमेदवारांच्या नावाची घोषणा कधीही जाहीर होऊ शकते," असं काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल म्हणाले. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत दोन याद्यांमध्ये 82 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय.
सोलापुरमधून प्रणिती शिंदेंना तिकीट मिळण्याची शक्यता : कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे सोलापुरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. सोलापूर हा त्यांच्या वडिलांचा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघ आहे. याशिवाय छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसंच महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना पक्ष चंद्रपूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते.
हेही वाचा :