मुंबई Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस प्रणित युवा संघटनांनी आता एकत्रित मेळाव्याची घोषणा केलीय. मुंबईत बुधवारी ६ मार्च रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तर आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अमोल मातेले यांनी दिलीय.
शिवसेना ठाकरे गटाचीही युवा सेना बैठक : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही आपल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी शिवालय येथे आयोजित केलीय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करणार आहेत. युवासेना यानिमित्तानं निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
युवा महाराष्ट्राभिमान मेळावा : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. या निवडणुकीत नवमतदारांना आपल्याकडं खेचून घेण्यासाठी युवा नेतृत्त्व सरसावलं असून यासाठी महाविकास आघाडीनं आता याची जबाबदारी संबंधित पक्षाच्या युवकांच्या संघटनांना दिलीय. त्यामुळं येत्या बुधवारी ६ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 'युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्याचं' आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई, युवक काँग्रेसचे अखिलेश यादव, कुणाल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मातेले, मेहबुब शेख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी वाटप : मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात या तिन्ही युवक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे. तर लोकसभेसाठी विशेष जबबादारी देण्यात येणार आहे. यात प्रामुख्यानं वाढती बेरोजगारी आणि इतर अनेक मुद्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. त्याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीकरिता रणनीती आखण्यासाठी या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. या मेळाव्याला इतरही अनेक संघटनांचा पाठिंबा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं राज्यातील युवकांना एकत्र आणण्याचा महाविकास आघाडीचा मानस असल्याचं मातेले यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- " निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींचा 'खरा चेहरा'..." इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड करण्यातील दिरंगाईवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
- "ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो", औद्योगिक मेळाव्यावरून शिवानी वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
- इंदापूरमध्येच हर्षवर्धन पाटील यांना वाटते सुरक्षेची चिंता; थेट देवेंद्र फडणवीस यांना घातलं साकडं