बारामती Baramati Loksabha : देशात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात (Supriya Sule Vs Sunetra Pawar) लोकसभेचा सामना रंगणार (Loksabha Election 2024) असल्याची चर्चा जोरदार आहे. त्या अनुषंगानं सुनेत्रा पवार सध्या बारामतीचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत, एकप्रकारे मीच या मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवार असल्याचे संकेत दिलेत.
सुनेत्रा पवार प्रचारात सक्रिय : बारामती शहराकडं एक विकासाचं मॉडेल म्हणून देशात बघितलं जातं. हे आपण सर्वजण ऐकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीला आणखी सुंदर आणि समृद्ध करू या. यासाठी सर्व बारामतीकरांनी एकत्रित येण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा 'हायटेक टेक्स्टाईल पार्क'च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन झालं.
सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साद : या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार बारामतीकरांना साद घालत म्हणाल्या, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीकरांवर नेहमीच लक्ष असतं. तळागाळातील शेवटच्या माणसांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील, याकडं त्यांचं नेहमीच लक्ष असतं. बारामतीत विकास कामांचा धडाका आपण पाहतच आहोत. विकासाचा हा रथ आपण सर्वांनी मिळून दादांच्या पाठीशी उभं राहून पुढं न्यायचा आहे. यासाठी तुम्ही सर्वजण साथ द्या, तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघं (अजित पवार व सुनेत्रा पवार) बांधील आहोत."
भूमिपूजनांच्या कार्यक्रमांचा सपाटा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीत विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुरु असलेल्या कार्यक्रमांना बारामतीकरांचाही मोठा प्रतिसाद असल्याचं दिसून येतंय. शनिवारी शहरातील आमराई परिसरात भीमनगर इथं समाज मंदिराच्या सभा मंडपाचं त्यांनी भूमिपूजन केलं. तसंच अनंत नगर इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिराचं उद्घाटनही सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर सिद्धार्थ नगर, बुद्ध विहाराचं विस्तारीकरण व भूमिपूजन सुनेत्रा पवारांनी केलं.
बारामतीकडं सर्व राज्याचं लक्ष : बारामती लोकसभा मतदार संघाकडं राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे. असं असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाल्याचं बारामतीत चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमालाही बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही गटाच्या कार्यक्रमाला बारामतीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार खासदार म्हणून निवडून येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवारही लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामतीसह तालुक्याचा दौरा करत आहेत. शनिवारी दिवसभरात त्यांनी विविध ठिकाणी भेटी घेऊन नागरिकांची संवाद साधला.
हेही वाचा :