नागपूर Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असं असतानाच आता प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उदयनराजे भोसले यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले उदयनराजे भोसले : उदयनराजे भोसले आज (19 फेब्रुवारी) चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरवरून चंद्रपूरला जाताना त्यांनी नागपुरच्या छत्रपती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना तुम्ही आव्हान देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उदयनराजे भोसले म्हणाले की, "लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. वयानं श्रीनिवास पाटील वडीलधारी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं आमच्यात होणाऱ्या लढतीला आव्हान म्हणणार नाही", असं ते म्हणाले.
मी भाजपकडूनचं निवडणूक लढवणार : तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की,"प्रत्येकाची इच्छा असते. यात मी अपवाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकऱ्यांनी देशाच्या प्रत्येक भागात विकास केलाय. त्यामुळं दुसरा विचार करणार नाही."
दांडपट्याला राज्य शस्त्र म्हणून घोषित केलं जाणार : उदयनराजे भोसले यांनी आज नागपूरच्या छत्रपती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर चंद्रपूरच्या दिशेनं पुढील प्रवास सुरू केला. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतेदेखील उपस्थित होते. आज चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुणा येथे दांडपट्याला राज्य शस्त्र म्हणून घोषित केलं जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा -