छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Prakash Ambedkar News : एआयएमआयएमनं मागील विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. "एका समाजाच्या मतांवर निवडणुका जिंकता येत नाही. जिल्ह्यात चर्चा आहे की, वंचितनं मुस्लिम उमेदवार दिला. मात्र एआयएमआयएमनं विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला. इथले खासदार वंचित मतांवर म्हणजेच ओबीसी मतांवर निवडून आले. युती केल्यावर धर्म पूर्ण करावा लागतो. युती धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका", असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुस्लिम समाजाला वंचितसोबत राहण्याचं आवाहन : पुढं प्रकाश आंबेडकर म्हणाले, "चंद्रपूर येथील प्रतिभा धानोरकर यांनी वक्तव्य केलं होतं की, सत्ता कुणबी समाजाकडं राहिली पाहिजे. तेव्हा मतदारांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं. आता ते तिसऱ्या क्रमांकावर जातील, अशी स्थिती आहे. मुस्लिम बांधव हे कार्यकर्ता-नेता चुकीचा असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहतात. त्याला चुकत असल्याचं सांगत नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाज मागे आहे. हिंदू धर्मातील धर्मनिरपेक्ष समाजानं आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन धर्मनिरपेक्ष उमेदवाराला मतदान दिलं. त्याची कदर तुम्हाला आहे का? नसेल तर आगामी काळात इतर समाजाचे लोक तुमच्यासोबत राहणार नाहीत. मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही सोबत राहू. पण तुम्ही राहणार का? तुमच्या समाजाचे आहे म्हणून गुन्हे माफ असाल तर ते योग्य नाही. असं असल तर भाजपा आणि तुमच्यात फरक नाही. धर्म नाही तर माणसाचे कर्तृत्व बघा. धर्मनिरपेक्ष समाजानं मुस्लिम उमेदवार औरंगाबाद लोकसभेत निवडून दिला. इतिहास कायम ठेवायचाय की नाही हे त्यांना ठरवावं लागेल", असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला वंचित सोबत राहण्याचं आवाहन केलं.
महाविकास आघाडीबरोबर वाटाघाटी सुरू असताना आम्ही धर्मनिरपेक्ष मतांवर ठाम राहू, भाजपा सोबत जाणार नाही, असं आश्वासन आम्ही शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) मागितलं. मात्र, हे आश्वासन देण्यास ते दोघंही तयार नव्हते-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिले नाहीत : काँग्रेसवर टीका करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "2019 मधील मतदार वंचित सोबत आहे. तुम्ही हरणाऱ्या सोबत जाता की जिंकणाऱ्या सोबत जाणार आहात? मुस्लिम समाजाचा कल काँग्रेससोबत आहे. मात्र त्यांनी अनेक राज्यात एक मुस्लिम उमेदवार दिला नाही. मागे ज्या चुका केल्या, त्यामुळं भाजपा निवडून आली. आता परत चूक केली तर भाजपाला आणण्याचा दोष मुस्लिम समाजाला लागेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, असं मुस्लिम समाजाला वाटतं. तेच वंचितलाही वाटतं. काँग्रेस म्हणते, भाजपा वॉशिंग मशीन आहे. काँग्रेसनं कोणती मशीन काढली? जिथं धार्मिक व्यक्ती धर्मनिरपेक्ष होतो? त्यांनी केवळ मुखवटा घातलाय."
पंतप्रधान मोदींवर टीका : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदार संघांच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळीही प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, "जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना काळात रेमडीसीवर हे देऊ नये, असं स्पष्ट केलं होतं. अन्य देशांनी त्यावर बंदी घातली असताना आपल्या देशात मोदींनी संबंधीत कंपनीला मुभा दिली. कारण, त्या कंपनीचा मालक गुजराती होता. त्यानं भाजपासाठी इलेक्टोरल बाँड खरेदी केले. त्यानंतर त्यांना रेमडीसीवर विकायची परवानगी दिली. पक्षाची तिजोरी भरून लोकांच्या जिवाशी खेळतो त्याला आता आपण सत्तेवर बसवायचं का?" असा सवालही आंबेडकरांनी यावेळी केला.
हेही वाचा -
- प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024
- 2014 नंतर 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्व का सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भागवत यांना सवाल - Lok Sabha Election 2024
- काँग्रेस गर्भगळीत, मोदींविरुद्ध उभे राहण्याची हिंमत नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar Alleges Congress