मुंबई PM Narendra Modi on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकामेकांविरोधात दावे प्रतिदावे करीत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिलीय. यामुळं राज्यातील राजकारण तापलं असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.
हरण्याच्या भीतीपोटी ऑफर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एनडीए बाबतच्या ऑफरवर बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील छत्रपतींच्या भूमीत नंदुरबार येथील सभेत स्पष्ट केलं असतं की आता आम्ही सत्तेत येणार नाही. आम्ही हरत असल्याचं वक्तव्य केलं असतं तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना माफ केलं असतं. मात्र महाराष्ट्राच्या भूमीत येऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीला नकली म्हणायचं आणि त्यांनाच आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा याचाच अर्थ असा होतो की नरेंद्र मोदी सत्तेच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट झालंय." तसंच आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील काल विधान केलंय की, 4 जूनला देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. त्या विधानाला एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुजोरा देत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची पराजय समोर दिसत असल्यामुळं भीतीपोटी कोणाला आपल्या सोबत कसं जोडायचं यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. शरद पवारांना नकली राष्ट्रवादी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे खेचण्यासाठी हात पसरायचं याचाच अर्थ त्यांचा पराजय निश्चित असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदींनी पवारांनपुढे नांग्या टाकल्या : लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पक्षाचा आणि एनडीएचा पराभव साफ दिसत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदlचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या सोबत सामील होण्याची विनंती केलीय, अशा प्रकारची दयनीय अवस्था कधीच झाली नसावी, महाराष्ट्र गद्दारी विसरला नसल्याचंही प्रवक्ता महेश तपासे यांनी म्हटलंय. भाजपानं महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून देखील मतदान वाढत नाही आणि आपलं सत्तेचं गणित जमत नाही हे पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर शरद पवार यांच्यासमोर नांग्या टाकल्या आहेत. पंतप्रधानांच्या ऑफरचा आम्ही पूर्णपणे अस्वीकार करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे यांनी स्पष्ट केलंय.
प्रचारातील एक खेळी : लोकसभेच्या निवडणुका सध्या सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिलेली ऑफर ही शरद पवारांच्या परवाच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीच्या अनुषंगानं आलेली आहे. काही प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना जाहीरपणे एनडीएत येण्याची ऑफर दिलीय. ऑफर सिरियसली घ्यावी असं आपल्याला वाटत नसून हे प्रचारातलं वक्तव्य आहे. अशा प्रकारची ऑफर जाहीरपणे कुणी देत नाही. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणार असं वक्तव्य दिसतं. हा राजकारणतला एक डाव म्हणता येईल. पवार जे बोलतात नेमकं त्या विरोधात ते करत असतात. काही काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होऊ शकतात या विरोधात ते करु शकतात. भाजपाचं सरकार जर सत्तेत बसलं तर त्यावेळेस शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते. पवार कायम सत्तेत राहिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य प्रचारातील एक खेळी म्हणता येईल, कारण शरद पवार लगेच भाजपासोबत जाणार नाही आणि नरेंद्र मोदी देखील त्यांना लगेच सोबत घेणार नाही, असं उदय तानपाठक यांनी म्हटलंय.
हेही वाचा :