पुणे Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मराठा आंदोलनासाठी २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. त्याप्रमाणं त्यांनी यात्रा सुरू केली आहे. त्यांचा पुण्यातील खराडी बायपास येथे मुक्काम होता. त्यानंतर आता जरांगे यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे.
पुण्यात केलं स्वागत : आज मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात पोहोचल्यानंतर त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. पुण्यात हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. डोक्यावर भगव्या टोप्या, हातात झेंडे, एका मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आला होता.
ही आंदोलनाची लढाई आहे. आरक्षण मिळण्याची लढाई असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी दिलेलं प्रेम या गर्दीतून दिसत आहे - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात : मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिकांची चौकात गर्दी जमली होती. दरम्यान, रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांना पाणी वाटपाची सोयही करण्यात आली होती. याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कसा जाणार मोर्चा : आज पाचव्या दिवशी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा मोर्चा पुणे शहरातील मुख्य रस्त्यावरून पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळा गावात पाचव्या दिवशी मुक्काम असणार आहे. जरांगे यांनी सुरू केलेल्या पायी यात्रेच्या अनुशंगाने सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लढाई आता तीव्र झाली आहे. मराठा समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून, वेळ पडली तर मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करू पण मराठा आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिलं होतं.
हेही वाचा -