छत्रपती संभाजीनगर : राजकारणात कोणता नेता काय निर्णय घेईल सांगता येत नाही. मागील आठवड्यात नांदेड लोकसभा लढणार अशी घोषणा करणाऱ्या एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपला निर्णय बदलत, आता पूर्व मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळं नेमकी रणनीती काय? असा प्रश्न निर्माण झालाय. पक्षानं निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर करताच भाजपानं त्याठिकाणी पैसे देऊन अनेक मुस्लिम उमेदवार उभे करण्याची रणनीती आखल्यानं माघार घेत असून पूर्व मतदारसंघात ताकदीनं लढणार अशी घोषणा जलील यांनी केली.
जलील विधानसभा लढणार : 2014 विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढून जिंकणारे इम्तियाज जलील यांनी आपला मतदारसंघ बदलला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्व मतदारसंघातून अर्ज भरला. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 2024 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळं त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी एमआयएम पक्षानं आधी नांदेड लोकसभा त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अचानक त्यातून माघार घेत पूर्व मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षानं भाजपाच्या बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून आपला उमेदवार बदलला त्यामुळं काय चाललंय ते लक्षात येईल असा आरोप जलील यांनी केलाय.
भाजपा मतांचे विभाजन करते : भाजपा नेहमीच मतांचं विभाजन करत डाव साधते. पूर्व मतदारसंघात भाजपा उमेदवार अतुल सावे अशीच खेळी खेळत आहेत. नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत असताना, त्याठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी पैसे देऊन मुस्लिम उमेदवार उभे केले जाणार असल्याचं लक्षात आलं. म्हणूनच त्या निवडणुकीतून माघार घेत आहे, आता सर्व लक्ष पूर्व मतदारसंघात केंद्रित करणार आहोत. इकडं मुस्लिम उमेदवारांना उभं करून मतांचं विभाजन केलं जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आमची भीती विरोधकांना आहे, आम्ही राज्यात फक्त पाच जागांवर लढत आहोत. भाजपा उमेदवाराच्या विरोधात उभा राहिलो आहे, त्यामुळं आम्हाला त्यांची बी टीम म्हणू नका अन्यथा आमचा बुट आणि तुमचं डोकं असेल असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय.
गफार कादरी निवडणुकीच्या रिंगणात : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा लक्षवेधी ठरला. तर जिल्ह्यातील पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एमआयएम पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील निवडणूक लढवणार असले तरी, त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेले गफार कादरी निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं भाजपा उमेदवाराचा मार्ग मोकळा होतोय का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला येतोय.
एमआयएम मध्ये देखील बंड : जिल्ह्यातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने मोठ्या प्रमाणात मते मिळवली. त्यांनी वेगळं आव्हान विरोधकांसमोर निर्माण केलं. त्यामुळंच या मतदारसंघात यंदा पक्ष चांगली लढत देईल अशी चर्चा सुरू झाली. पूर्व मतदारसंघात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील निवडणूक रिंगणात उभे राहिल्यानं भाजपा विरोधात त्यांची चांगली लढत होईल. असं वाटत असताना त्यांच्याच पक्षातील नेते गफार कादरी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं पुन्हा एकदा मतांचं विभाजन होईल. सावे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंडखोरी झाली असली तरी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यात राजकीय पक्षांना यश मिळेल का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -