नाशिक Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2004 मध्ये जेव्हा राज्यात सरकार स्थापन झालं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागा असून सुद्धा मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला होता, असं म्हटलंय. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा केलाय. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडं मुख्यमंत्रिपद सोपवण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडं मुख्यमंत्रिपद दिलं असतं, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, मी काँग्रेसला सोडलं नसतं, तर मी मुख्यमंत्री झालो असतो, पण शरद पवारांसोबत राहिलो, अशी प्रतिक्रिया, मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
तर मीच मुख्यमंत्री झालो असतो : "1995 साली आमचं सरकार गेलं. त्यानंतर शरद पवार यांनी मला एमएलसी केलं आणि नंतर विरोधी पक्षनेता केलं. तेव्हा शिवसेना-भाजपा सत्तेत होते. त्यावेळी मी जी भूमिका घेतली, त्यामुळं माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला. मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो. त्या काळात काँग्रेस फुटली नसती, तर माझी खात्री आहे की, मीच मुख्यमंत्री झालो असतो," असं छगन भुजबळ म्हणाले.
मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला : "शरद पवार ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले, पक्ष फुटला तेव्हा, तुम्ही काँग्रेसमध्येच थांबावे, विधानसभेची निवडणूक झाली की, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो, असा निरोप मला महाराष्ट्र दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आला. मात्र, मी शरद पवार यांच्यासोबत राहणार, असं त्यांना सांगितलं. त्यावेळी राष्ट्रवादीची पहिली निवडणूक होती, मी आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला. तेव्हा शिवसेना-भाजपा वेगळी लढली. अशात तेव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मला उपमुख्यमंत्री केलं. तेव्हा मात्र पक्ष फुटला नाही," असंही भुजबळ यांनी म्हटलंय.
शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया : "2004 साली अजित पवार नवीन होते हे बरोबर आहे. मी आधीपासून शरद पवार यांच्यासोबत होतो. 2004 साली जास्त जागा आल्यावर काँग्रेस पक्ष आम्हाला मुख्यमंत्रिपद द्यायला तयार होता. दिल्लीत आम्ही जाऊन बोललो. मात्र, शरद पवार नाही म्हणाले, असंही काँग्रेस श्रेष्ठी आम्हाला बोलले. मात्र, मला मुख्यमंत्रिपद दिल्यावर पक्ष फुटला असता, असं ते का म्हणाले? याबाबत मला माहीत नाही," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी देत त्या विषयावर जास्त भाष्य करणं टाळलं.
मतदारांनी मोदींच्या पाठीशी राहण्याची गाठ बांधली : "मतदारांनी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी राहण्याची गाठ बांधली आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला देखील कमळ फुलले आहेत. त्यामुळं सर्वांनी महायुतीला मतदान करा, नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे. यावर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येतील," असा विश्वास, भुजबळ यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा -
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news
- "मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्याची कुणाचीही हिंमत नाही, निवडणुकीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीचं..."- योगी आदित्यनाथ - Lok Sabha Election 2024
- 'इंडिया' आघाडी पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफांच्या केकची आठवण; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले संघावर घालतील बंदी - India Alliance Press Conference