मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यासह दिग्गज उमेदवारांनी अर्ज भरला आहे. ढोल ताशांच्या गजरात, जेसीबीने फुले उधळत उमेदवारांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
मुख्यमंत्री शिंदेंनी अर्ज केला दाखल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. शिंदे विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे केदार दिघे यांनी देखील आज अर्ज दाखल केला.
युगेंद्र पवारांनी दाखल केला अर्ज : पुण्यातील बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवारांचा अर्ज दाखल करताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
विजय वडेट्टीवारांनी दाखल केला अर्ज : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे त्यांच्यासोबत बैलगाडीतून अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांनी अर्ज दाखल केला. माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी मनसेतर्फे अर्ज दाखल केला. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.
नजीब मुल्ला, संजय केळकरांनी दाखल केला अर्ज : ठाणे शहर मतदारसंघातून भाजपाचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी मानखु्र्द शिवाजीनगर मतदारसंघातून अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांचा सामना आहे.
सना मलिक शेख यांनी दाखल केला अर्ज : अणुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सना मलिक शेख यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांचे वडील नवाब मलिक उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी अर्ज भरला. त्यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी चांदिवली मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केला. यावेळी आमदार अनिल परब, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप उपस्थित होते.
समीर भुजबळ यांनी दाखल केला अर्ज : वांद्रे पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे झिशान सिद्दीकी यांनी अर्ज दाखल केला. बेलापूर मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे.
उत्तम जानकर यांनी दाखल केला अर्ज : एकनाश शिंदेंच्या शिवसेनेतर्फे कोल्हापुर उत्तर मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मागाठाणे मतदारसंघातून आमदार प्रकाश सुर्वे यांनी अर्ज भरला. कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंनी अर्ज भरला. मालेगाव बाह्य मतदारसंघातून मंत्री दादा भुसे यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांनी अर्ज भरला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातून महेबूब शेख यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.
हेही वाचा -