मुंबई ED arrested CM Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) अटक केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अटकेच्या निषेधार्थ देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज देशभरात आप व इंडिया आघाडी कडून आंदोलन केले जाणार आहे.
मोदी फक्त केजरीवाल यांना घाबरतात : राज्यातील 'आप'चे सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितलंय की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात केवळ एका व्यक्तीला घाबरतात. ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. हुकूमशाही पद्धतीनं अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा या निमित्तानं निषेध करायला हवा. परंतु, अरविंद केजरीवाल यांना अटक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अरविंद केजरीवाल हा एक विचार असल्याचे कळत नाही. या विचाराच्या माध्यमातून दिल्लीत विकासाचं मॉडेल तयार करण्यात आलंय. ते मॉडेल देशभरातील जनतेच्या मना-मनामध्ये उतरलेलं आहे. त्यामुळं विचाराला कधीच अटक करता येत नाही. आज दिल्लीत सर्व सामान्य माणसाला मोफत शिक्षण, मोफत आरोग्यसेवा आणि मोफत पाणी भेटत आहे. 75 टक्के लोकांच विजेचं बिल हे शून्य येत असून सरकारही फायद्यात चाललंय. याचं एकमेव कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात असलेलं दिल्ली सरकार आहे. त्यामुळे फक्त दिल्लीमध्ये नव्हे तर देशभरात अरविंद केजरीवाल यांच्या विकासाच्या राजकारणाचा विचार लोकांच्या मनामध्ये मुरलेला आहे. त्यामुळे या विचाराला भारतीय जनता पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अटक करू शकत नाही."
आज देशभर अटकेच्या निषेधार्थ आंदोलन : "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच सर्व प्रमुख महानगर शहरांमध्ये आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार आहेत. संविधानिक पद्धतीनं आंदोलन करणार आहेत. तसंच लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व जनतेला आम आदमी पक्षाच्या या संविधानिक आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं पक्षाकडून विनंती करण्यात आलीय. या हुकुमशाही दडपशाही सरकारचा निषेध करायचा आहे. या सरकारला मतपेटीच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू," असे आपचे नेते शिंदे म्हणाले.
हेही वाचा :