ठाणे Dispute In MVA : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीचा तिढा शरदचंद्र पवार गटाचे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना जाहीर केलेल्या उमेदवारीनं नुकताच सुटला आहे. परंतु, महाविकास आघाडीनं भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यानं ही उमेदवारी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. तसंच भिवंडी लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.
बाळ्यामामांनी प्रचारासाठी काँग्रेसचे झेंडे, चिन्हं वापरू नये : भिवंडी लोकसभा मतदार संघातील ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत शुक्रवारी (5 एप्रिल) मुंबई-नाशिक महामार्गावरील वाटिका हॉटेलमध्ये दुपारी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मित्र पक्ष म्हणून बाळ्यामामांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं जाणार नसल्याचा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत समंत केला आहे. तसंच बाळ्यामामांनी प्रचारासाठी काँग्रेसचे झेंडे, चिन्हं वापरू नये, असंही कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. इतकंच नाहीतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला, सभेला जाऊ नये असा ठरावही या बैठकीत घेण्यात आला आहे.
काय म्हणाले दयानंद चोरघे? : पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे म्हणाले की, भिवंडी मतदारसंघात काँग्रेसची जागा परंपरागत आहे. बाळ्यामामांची उमेदवारी महाविकास आघाडीनं नाही, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं वैयक्तिकपणे जाहीर केली आहे. त्यामुळं आता मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार असून इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे आणि सुरेश टावरे या दोन नावाचा पर्याय बैठकीत देण्यात आला आहे. यासह गरज पडली तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बंडखोरीला देखील तयार असल्याचं चोरघेंनी सांगितलं.
हेही वाचा -
- भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर, कपील पाटील यांना देणार काटे की टक्कर - Lok Sabha Election 2024
- माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ कोणाला मैदानात उतरवणार? दिवंगत गणपत देशमुखांच्या शिष्याचं नाव चर्चेत - Lok Sabha Elections
- भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाजाच्यावतीने मविआ उमेदवारांना पाठिंबा, लक्ष्मण माने यांची घोषणा - Lok Sabha Election 2024