नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी येऊ लागल्याचं बोललं जात आहे. यावर माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या बोलण्यात नैराश्य दिसत असल्याचं ते म्हणाले आहेत.
"निवडणूक म्हंटल की, जयपराजय होत असतो. त्यात एवढं खचून जाण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्या बोलीतून आणि वागण्यातून नैराश्य दिसून येत आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे. त्यामुळं त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यास तयार आहोत. संजय राऊत यांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ," असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
कुछ तो गडबड है : शरद पवार पक्षाचे पाच खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर भाजपानं अजित पवार यांना दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "संजय राऊत राज्यसभा खासदार आहेत, ते दिल्लीत आहे. त्यामुळं दिल्लीत घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती त्यांच्याकडे असते. कदाचित त्याच्या आधारावर त्यांनी हा गौप्यस्फोट केला असावा. परंतु दिल्लीमध्ये सध्या बैठकांचा जोर वाढला आहे, त्यातून कुछ तो गडबड है, असं म्हणायला स्कोप आहे." असा चिमटा विजय वडेट्टीवार यांनी काढला.
दुसऱ्याचं घर, पक्ष फोडून भाजपाला असुरी आनंद मिळतो : दिल्लीत काल (12 डिसेंबर) अजित पवार यांच्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर राज्यात काही तरी मोठं घडेल, असं बोललं जात आहे. शरद पवारांचा पक्ष केंद्रात सत्तेत सहभागी होईल किंवा अजित पवार यांच्यासोबत राज्याच्या सत्तेत सहभागी होईल, अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले,"निवडणुका झाल्या की, अशा चर्चा महिना दोन महिने सुरू असतात. हा इकडे जाणार, तो सत्तेत जाणार, याला काही फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. मला विश्वास आहे, शरद पवार यांनी इतकी वर्षं पुरोगामी विचार राज्यात रुजवण्याचे कष्ट घेतले, अशा विचारांपासून ते दूर जातील असं वाटत नाही. भाजपाला दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचा पक्ष फोडण्यात असुरी आनंद मिळतो," असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व नाही : "हिवाळी अधिवेशनात फार काही निष्पन होणार नाही. नागपूरला अधिवेशन का घेतलं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांना त्रास द्यायला पाच पाच दिवसाचं अधिवेशन आहे का? अधिवेशनात प्रश्न उत्तरं नाहीत, ना लक्षवेधी, ना कुठल्या बिलावर चर्चा. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. एखाद-दोन प्रस्ताव हे सत्ताधारी आणि विरोधकांकडून येण्याची शक्यता आहे. त्याला सुद्धा वेळ कमी पडेल, असं मला वाटतं. त्यामुळं या हिवाळी अधिवेशनाला फार काही महत्त्व नाही. केवळ फॉर्मलिटी पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन होतं. हेचं अधिवेशन मुंबईत घेतलं असतं, तर बरं झालं असतं," असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
हेही वाचा
- लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदेंचं लक्ष्य पालिका निवडणुकीवर, विजयाची रणनीती काय?
- दोन्ही पवारांनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, दुसरीकडे अंकुश काकडे यांचा अजित पवारांना टोला
- भाजपाचं हिंदुत्व केवळ मतांसाठी; बांगलादेशात हिंदू मारले जात असताना मोदी शांत कसे? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल