बारामती Madha Lok Sabha Constituency : 'माढा मतदारसंघातील अनेक लोक मला भेटले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मोहिते पाटील यांचं नाव पुढं आलंय. येत्या दोन दिवसांत धैर्यशील मोहिते पाटीलांचा प्रवेश होईल. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल, असं सांगत माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील घरातीलच असेल असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
लवकरच पक्षप्रवेश होईल : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "माढ्यासंबंधीचा आमचा विचार सुरु आहे. काही प्रस्ताव आले आहेत. गुरुवारी माळशिरस, अकलूज भागातील अनेक सहकारी भेटले. त्यांनी धैर्यशील यांचं नाव दिलेले आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या एक दोन दिवसांत होईल. पक्षाचे अध्यक्ष व काही वरिष्ठ नेते अकलुजला जातील. पहिल्यांदा पक्ष प्रवेश होईल. पक्ष प्रवेश झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. ती जाहीर करण्याची जबाबदारी आम्हा लोकांवर आली. त्या मतदारसंघात तरुणांचा, वडीलधाऱ्यांचा मोठा पाठींबा दिसतोय. आम्हा सर्वांसमोर आलेल्या मतामध्ये मोहिते पाटील यांच्या नावाला अनुकुलता दिसते आहे. पक्ष प्रवेशानंतर उमेदवारी जाहीर करत मोहिम सुरु करु."
साताऱ्यात राजा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता : साताऱ्याच्या जागेचा आमचा उमेदवार पक्षाच्या अध्यक्षांनी जाहीर केलाय. तिथं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलीय. तिथं एका बाजूनं राजा तर दुसऱ्या बाजूनं माथाडी कामगार म्हणून काम केलेला सर्वसामान्य कुटुंबातील पण कर्तृत्ववान कार्यकर्ता अशी निवडणूक होईल. लवकरच तिथं अर्ज दाखल होतील, असं शरद पवारांनी म्हटलंय.
ताकवणे सोबत पण भीमा पाटसमध्ये रस नाही : पुणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा आनंद आहे. दौंड तालुक्यात, जिल्ह्यात त्यांनी भाजपाचं काम केलंय. भीमा पाटस कारखान्याचे प्रश्न मांडले आहेत. या कारखान्यावर आता नवीन व्यवस्थापन आलंय. त्यामुळं कारखाना संकटातून बाहेर निघेल असं चित्र दिसतंय. संघटनेत नवीन लोकांचं स्वागतच आहे. पण साखर कारखान्याच्या निवडणूकीत आम्ही रस दाखवण्याची भूमिका घेणार नाही. तो कारखाना चालला पाहिजे, शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे, त्यांच्या उसाला अधिक भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका घेवून कोणी आमच्याकडे येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :