मुंबई BJP on Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर यावरुन राजकारण फार तापलंय. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी याबाबत संजय राऊत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झाला असून औरंगजेबाची विचारसरणी गुजरात व त्यानंतर दिल्लीतून महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपा नेत्यांनी खरपूस समाचार घेतला.
निवडणुकीतील पराभव दिसत असल्यानं उद्धव ठाकरे, राऊत वेडेपिसे : संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम म्हणाले की, "उद्धव ठाकरे व त्यांचे नेते संजय राऊत यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव समोर दिसत आहे. म्हणून ते वेडेपिसे झाले आहेत. अशामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत औरंगजेब अशा शब्दाचा प्रयोग ते करत आहेत. अरे औरंगजेबानं हिंदूंची मंदिरं तोडली, तर दुसऱ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापित केलं. काशी विश्वनाथ असेल, उज्जैनचं महाकालचं मंदिर असेल, बाबा केदारनाथ असेल, संजय राऊत यांच्या डोळ्याची नजर कमी झाली आहे का? उद्धव ठाकरे यांची स्मरणशक्ती गेली आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा आदरणीय मोदीजी एका विश्व पुरुषाप्रमाणे या देशाच्या उत्थानासाठी काम करत आहेत. मागील दहा वर्षात त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यांचं संपूर्ण जीवन या देशासाठी समर्पित आहे. या देशानंच नाही तर विश्वातील अनेक देशानं त्यांना विश्वनेता म्हणून स्वीकार केलं आहे." तसंच उद्धव ठाकरे व राऊत महाराष्ट्रात तुमची एकही जागा निवडून येणार नाही. ही तुमची लायकी आहे. आपली लायकी बघून तरी मोदींवर टीकाटिपणी करा, असा खोचक टोलाही राम कदम यांनी त्यांना लगावलाय.
उद्धव ठाकरेंना औरंगजेबाची कावीळ : भाजपाचे नेते तथा भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पांडे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी ठाकरे आडनाव लावणं बंद केलं पाहिजे. तो त्यांना अधिकार राहिलेला नाही. हिंदूत्त्व आणि ठाकरे हे समीकरण आहे. पण उद्धव ठाकरे राजरोस त्याला शेण फासत आहेत, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. कलम 370 हटवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न कर्तबगार अमित शाहांनी पूर्ण केलं. त्यावर टीका करता, मेहबूबा मुफ्तींसोबत हात मिळवता हे महाराष्ट्राला दिसत नाही का? उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांच्या जीवावर पैसा कमावला. त्यातून शेकडो दहशतवादी पोसलेत. तेच दहशतवादी उद्योगपतींच्या घरी बॉम्ब ठेवून येतात. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो मुंबईकर मारले गेले. त्यात दोषी आढळलेल्या याकुबच्या कबरीवर बीएमसीनं दिवा लावला होता, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
हेही वाचा :