बारामती CM Eknath Shinde On Baramati City : बारामती येथे 'नमो महारोजगार' मेळावा (Namo Rojgar Melava) घेण्यात आला. यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. बारामती शहर हे एक विकासाचं प्रारूप आहे. 'नमो रोजगार मेळाव्यामुळं तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यांनी आपलं भवितव्य साकारावं', असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केलंय. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा आहे. यातून २५ हजार युवांना रोजगार मिळणार आहे.
बारामती शहर विकासाचे मॉडेल : बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचं मोठं योगदान आहे. विकास कामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येतं.
राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक : पोलीस हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असताना सण, उत्सव, आंदोलने अशा कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत. राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई-सुविधा युक्त अशी सुसज्ज 'बसपोर्ट' करून प्रवाशांना सर्व सोई-सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.
विविध विकास कामाचं उद्घाटन : यावेळी बारामतीतील विविध विकास कामांतर्गत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसंच पोलीस वसाहतींचं उद्घाटन, पोलीस वाहनांचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
१ लाख ६० हजार रोजगार दिले : राज्यात यापूर्वी नोकर भरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेले ही समाविष्ट आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा -