संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर विधानसभा मतदारसंघात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. जोर्वे गावामध्ये जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जयश्री थोरात यांनी नागरिकांशी संवाद साधला. जोर्वे गटातील विविध गावांमध्ये जनसंवाद यात्रेदरम्यान जयश्री थोरात यांनी नागरिकांशी संवाद साधला. यानंतर जोर्वे येथे सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर राहता तालुक्याच्या नेत्या प्रभावती घोगरे, इंद्रजीत थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गावागावांमधून या युवा संवाद यात्रेचं भव्य उत्स्फुर्त स्वागत करण्यात आलं.
"आमदार बाळासाहेब थोरात यांचा परिवार हा पाच, दहा लोकांचा नसून सात लाख लोकांचा आहे. तालुका त्यांचा परिवार आहे. आमदार थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आणि अस्मिता असून तालुक्याकडं वाकड्या नजरेनं पाहाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू देऊ". - डॉ. जयश्री थोरात, अध्यक्षा, युवक काँग्रेस
तालुक्यातील जनतेला दिला त्रास : यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, "फोडाफोडी करून खोके देऊन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मागील अडीच वर्षात सत्ताधारी आणि पालकमंत्र्यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेला मोठा त्रास दिला. ॲट्रॉसिटी आणि खोटे गुन्हे दाखल केले. ज्या वयात मुलांनी अभ्यास करायला पाहिजे. त्या वयात मुलांना वाईट सवयी लावल्या. शिर्डी मतदार संघातील गणेश कारखाना, दूध संघ, राहुरीचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे". राहता तालुक्याची वाट लावणारे आता संगमनेरच्या विकासाबद्दल बोलतात हे मोठे आश्चर्य आहे.
आमदार बाळासाहेब थोरात हे स्वच्छ आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांनी कधीही कुणाला त्रास दिला नाही. विरोधकांचाही सन्मान केला. तुम्ही आमच्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुखाबद्दल, माझ्या बापाबद्दल बोलाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. - डॉ. जयश्री थोरात, अध्यक्षा, युवक काँग्रेस
तुमची दडपशाही संगमनेरमध्ये चालणार नाही : जोर्वेच्या मातीमधून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, आमदार बाळासाहेब थोरात अशी मोठी माणसं घडली. एकवेळ तुम्ही पराभूत होता होता वाचले. या 28 गावांनी पक्षनिष्ठा राखून तुम्हाला जगवले. आता मात्र सर्वांनी एकजुटीने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. राहता तालुक्यात सुद्धा आपल्याला स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे. तेथेही बाळासाहेब थोरात यांच्या विचारांचा आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. त्रास तुम्ही देता, दडपशाही तुम्ही करता हे सर्वश्रुत आहे पण तुमची दडपशाही संगमनेरमध्ये चालणार नाही. आपल्या तालुक्यातील काही घरभेदी आहेत त्यांनी तुम्ही कोणाला घरात घेताय हे पहावे असं आवाहन केलं.
संगमनेरच्या अस्मितेला डिचवण्याचा प्रयत्न करू नका : प्रभावती घोगरे म्हणाल्या की, विखे परिवाराच्या पायाखालची वाळू घसरली आहे. नगर दक्षिणमध्ये जर इतका विकास केला. तर तेथील लोकांनी का नाकारले. याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. संगमनेर तालुका एकवटला आहे. अहमदनगर जिल्हा जाणून आहे, संगमनेरच्या अस्मितेला डिचवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हा तालुका एकजूट होऊन लढला. यावेळी विविध गावांमध्ये तरुणांनी जोरदार भाषणे केली. याप्रसंगी जोर्वे गटातील विविध गावांमधील युवक, महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -