मुंबई Lok Sabha Election : मुंबईसह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये महायुतीसह महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतीक्षा असल्यानं या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रम आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपाकडं असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढविणार असल्यानं, या मतदारसंघात कोणाला संधी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.
जागा शिवसेनेला द्या : काँग्रेस या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात सक्षमपणे लढू शकेल असा उमेदवार शोधत आहे. मात्र, या लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसचे एकमेव आमदार अस्लम शेख यांनी थेट दिल्ली गाठली. उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसकडं उमेदवार नसल्यानं ही जागा शिवसेनेला द्यावी असं त्यांनी सुचवलं. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या बैठकामध्येही अस्लम शेख यांनी आपलं हे मत प्रदर्शित केलंय. अस्लम यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना भेटून आपलं मत सांगितलं.
कॉंग्रेस निवडणूक लढण्यास सक्षम : अस्लम शेख यांच्या या भूमिकेमुळं आधीच या भागात संभ्रमात असलेले काँग्रेस कार्यकर्ते अधिकच संभ्रमात आहेत. यासंदर्भात बोलताना काँग्रेस समितीनं लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या माध्यम विभागाच्या सदस्य, माजी मगरसेविका शितल म्हात्रे म्हणाल्या की, उत्तर मुंबई लोकसभेला गेली 20 वर्षे कधीच स्थानिक रहिवासी उमेदवार म्हणून मिळालेला नाही. कदाचित त्यामुळंच लोक आपण कमकुवत आहोत असं मानतात. उत्तर मुंबईत काँग्रेसच्या मतदारांची संख्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय.
मग काँग्रेसनं सक्षमपणे उमेदवार द्यावा : गेल्या 25 वर्षांपासून मालाडमध्ये काँग्रेसकडं एक आमदार आहे. त्याचप्रमाणं शिवसेनेकडं ही एक आमदार होता. जो आता शिंदे गटात गेला आहे. जर शिवसेनेचे माजी आमदार दावा करू शकतात, तर ज्या काँग्रेसकडं विद्यमान आमदार, माजी मंत्री आहे त्यांनी का म्हणून गप्प बसावं? काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षाची निवडणूक लढवण्याची तयारी आहे, मग काँग्रेसनं सक्षमपणे उमेदवार द्यावा. आमचे आमदार, जिल्हाध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या लोकसभेला स्थानिक रहिवासी काँग्रेस कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास आम्ही जोरदार लढत देऊ. 2004 मध्ये एकनाथ गायकवाड आणि मुरली मनोहर जोशी यांच्यात घडलेल्या प्रकारासारखाच या वेळी निकाल लागेल, असंही म्हात्रे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
- आम्हाला राज्य नाही तर सेवा करायचीय; अनुराग ठाकुर यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर - Anurag Thakur
- माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच, कधी होणार मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश, खुद्द शरद पवारांनीच सांगितलं - Madha Lok Sabha Constituency