छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार असल्याची शक्यता निर्माण झालीय. शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी "दोन दिवसात राजकीय भूकंप होईल," असं विधान केलं असतानाच आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदेंच्या शिवसेना वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झालीय. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्यानं नाराज झालेले अंबादास दानवे शिंदे गटात जाणार असल्याचं बोलल जातंय. मात्र यावर अद्याप दानवे यांच्याकडून प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.
नाराज दानवे जाणार शिंदे गटात ? : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नते अंबादास दानवे एकनाथ शिंदे गटात जातील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवार म्हणून आपल्या कामाला सुरुवात केलीय. मातोश्रीवरुन त्यांना तसेच संकेत मिळाल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. या मतदारसंघात नवीन चेहरा हवा असा आग्रह अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केला होता. मात्र त्याबाबत त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही, इतकंच नाही तर "खैरेंऐवजी मला लोकसभा लढू द्या," अशी मागणीही दानवे यांनी पक्षाकडे केली होती. मात्र निवडणुकीच्या काळात राज्यभर प्रचार करण्यासाठी दानवे यांच्यासारखा नेता आवश्यक आहे. त्यामुळं उमेदवारी खैरेंना दिली जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळंच दानवे नाराज असून त्यातच संभाजीनगर लोकसभा शिंदे गटाला सुटेल अशी शक्यता असल्यानं ते शिंदे गटाकडून लोकसभा लढवतील असं देखील बोललं जातंय.
खैरे - दानवे यांचं सुत जमेना : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यातील अनेक वेळा असलेला अबोला बरच काही सांगून जातो. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळेस दानवेंची अनुपस्थिती सर्व काही सांगत होती. याआधी देखील दोघात असलेले वाद अनेक वेळा चव्हाट्यावर आले आहेत, असं असलं तरी दोघांकडून आमच्यात कुठलेही वाद नसल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर दोन महिन्यांपूर्वी अंबादास दानवे यांनी व्हॅनिटी व्हॅन तयार केली आणि त्याचं पूजन चंद्रकांत खैरे यांच्या हातून करण्यात आलं. "कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करु," असं दोन्हीही नेते सांगत असले, तरीही आतून मात्र दोघांची महत्त्वकांक्षा पक्षापेक्षा अधिक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळंच दानवे पुढच्या दोन दिवसात वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
संजय शिरसाट यांनी केलं होतं सूचक वक्तव्य : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत "दोन दिवसात राजकीय भूकंप होईल, बघत रहा," असं विधान केलं होतं. त्यामुळं दानवे यांचा शिंदे गट पक्षप्रवेशाचे मिळालेले संकेत हा तर भूकंप नाही ना? असं बोललं जातंय. अंबादास दानवे यांना 2019 मध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र प्रस्थापित खासदार असल्यानं खैरे यांना संधी मिळाली. इतकंच नाही तर खैरे यांच्या पराभव होण्यामागं दानवेंचा मोठा हात होता अशी राजकीय चर्चा देखील त्यावेळी रंगली होती. त्यामुळं दोघांतील असलेल्या वादाचा फटका ठाकरे गटाला बसणार का? हे मात्र बघण्यासारखं असेल.
हेही वाचा :