मुंबई Ambadas Danve On Shinde Government : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (1 मार्च) शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसात भिडले असल्याचं बोललं जातय. या मुद्द्यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षामध्ये सध्या गँगवॉर सुरू असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. सत्ताधारी पक्षातील एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करतो. त्यामुळं कायदा कुठंय? हे सरकार राज्यातील गुन्हेगारीला खतपाणी घालतंय. तसंच गुन्हेगारी थांबवण्यास या सरकारला अपयश आल्याचंही ते म्हणाले.
गॅंगवॉर आता पवित्र मंदिरात : पुढं ते म्हणाले की, राज्यात सध्या पेपर फुटीचे प्रकार वाढतायत, मंत्रालयात गुन्हेगार रिल्स काढत फिरताय, गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि आता हीच गुंडांची गॅंगवॉर पवित्र विधान भवनाच्या मंदिरापर्यंत पोहोचली आहे. आज सत्ताधारी पक्षातील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विकास कामावरून धक्काबुक्की झाल्याचं आम्हाला माध्यमातून समजलं. या ठिकाणी राज्यातील तळागाळातील जनसामन्यांचे प्रश्न सोडवले जातात आणि याच पवित्र मंदिरात हे दोन आमदार एकमेकांना धक्काबुक्की करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. या सरकारचा कशावरच वचक राहिलेला नाही.
वादाचं कारण काय : मंत्री शंभूराज देसाई यांनी भुसे-थोरवे यांच्यात कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केलाय. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या लॉबीत आज मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विकास कामावरून बोलणं सुरू होतं. आमच्या मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य दिलं जात नाही, निधी दिला जात नाही, तसंच दुर्लक्ष केलं जातंय अशी व्यथा महेंद्र थोरवे यांनी भुसे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर संवादादरम्यान दोघांचाही आवाज वाढला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसंच यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली, असं सांगितलं जातंय.
हेही वाचा -
- भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की नाही हो, चर्चेत 'आवाज थोडासा वाढला' एवढंच...; शंभूराज देसाई यांचा खुलासा
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची एकजूट कुठेच दिसेना, महत्त्वाच्या प्रश्नांवरही विरोधक शांतच!
- नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी तर मंडपासाठी १२ कोटी खर्च केल्याचा पटोलेंचा दावा