पुणे NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर आमदार अपात्रतेप्रकरणी आज (15 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. त्यात अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं ते म्हणाले. तसंच यासंबंधी अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजांना शरद पवार गटानं आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले. यावरच आता कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली असून आमदार आणि खासदार यांच्या विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. तसंच लोकशाहीचं अधपतन सुरू असल्याचंही उल्हास बापट म्हणाले आहेत.
काय म्हणाले कायदेतज्ञ : यासंदर्भात प्रतिक्रिया देत कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले की, "लोकशाही धोक्यात आली असून आता याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालयानंतर जनताच याचा निर्णय घेईल. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावल्यानंतर त्यांनासुद्धा जनतेनं सत्ता दिली नाही. तसंच जनता दलाच्या पक्षानंसुद्धा नीट कारभार केला नाही. त्यामुळं त्यांचीही सत्ता गेली. आता शेवटची आशा ही जनतेचं न्यायालय म्हणजेच निवडणुका आहेत", असं उल्हास बापट म्हणाले.
नार्वेकरांवर साधला निशाणा : "इंग्लंडमध्ये जर पक्षांतर केलं तर इतर पक्ष त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत नाहीत. इथे मात्र सत्ताधारी पक्ष प्रवेश देत आहेत. आजच्या निकालात नवनवीन शोध लागल्याचं बघायला मिळालं. पक्षाचे अंतर्गत मतभेद म्हणजे पक्षाचं विभाजन नाही. तसंच त्याला शेड्यूल 10 लागत नसल्यासही नार्वेकर म्हणाले. हा नवीनच शोध लागलाय. तसंच राज्यशास्त्रात असं शिकवलं जातं की ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत आहे त्याचे सर्व अधिकार हे पंतप्रधानांना असतात. त्याचा एककेंद्री प्रभाव हा सर्व यंत्रणावर असतो. तेच सध्या या निकालावरून दिसतंय. परंतु शेवटी आशेचा किरण ही जनताच आहे."
अखेरचा पर्याय सर्वोच्च न्यायालय : पुढं ते म्हणाले की, "आजच्या निकालाविरोधात आता शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. लोकशाहीत सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. आजच्या निकालात नवीन काहीच नाही. अंपायरने योग्य भूमिका निभावली नाही", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -