मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांनी घड्याळ हातात बांधलं. दुष्काळी भागात झाडं लावण्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात सयाजी शिंदे यांचा मोठा वाटा आहे. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. त्यामुळं आम्ही त्यांना सोबत घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
पक्षाला अधिक बळकटी येईल : "सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल तसंच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास मला आहे," असं म्हणत अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीची धोरणं आवडली : "चित्रपटात गृहमंत्र्यांची, व्हिलनची तसंच विविध भूमिका केल्या. त्यामुळं मी राजकारणात येईन, असं वाटलं नव्हतं. माझ्या या पक्षप्रवेशानं अनेकांना धक्का बसला असेल. आईच्या वजनाएवढ्या बी लावण्याचं धेय्य ठेवलं होतं. त्यानुसार राज्यभरात काम सुरू आहे. अजित पवारांचं काम हे 'एक घाव दोन तुकडे' असं आहे. वृक्षारोपणासाठी त्यांनी नेहमी सहकार्य केलं. त्यामुळं त्यांच्याबद्दल नेहमी आदर आहे. बाहेर राहून बोलण्यापेक्षा सिस्टिममध्ये प्रवेश करुन काम करण्याचा विचार केला. तसंच राष्ट्रवादीची धोरणं आवडली अन् मी पक्षात येवून काम करण्याचं ठरवलं," अशी भावना अभिनेते सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केली.
अभिनेते सयाजी शिंदे 'स्टार प्रचारक' : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली. येणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी सयाजी शिंदे हे राष्ट्रवादीचे 'स्टार प्रचारक' असणार आहेत. त्यांना तिकीट देणार का? यावर अजित पवार म्हणाले, "उमेदवारांना निवडून आणण्याचं काम हे स्टार प्रचारकांचं असतं. त्यानुसार सयाजी शिंदे हे प्रचाराचं काम करतील आणि त्यानंतर पुढं बघू."
ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी श्री. सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल… pic.twitter.com/oXWmCLDMsl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 11, 2024
'अभिनेते ते नेते' : "दसरा आम्हाला आज साजरा करण्याचं भाग्य लाभलं. राज्यात व राज्याबाहेर सयाजी शिंदेंनी मोठा ठसा उमटवला. बॉलिवूड ते टॉलिवूडपर्यंत त्यांचं मोठं नाव आहे. ते अभिनेते आहेतच आता नेते देखील झाले. सामाजिक कार्यात मोठं काम ही त्यांची मोठी ओळख आहे. मराठी माणूस असूनही दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. राजकारण त्यांना काहीही कठीण वाटणार नाही," अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा