छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Aaditya Thackeray Stage Collapsed : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली असून राजकीय नेत्यांच्या सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज (22 एप्रिल) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. मात्र, यावेळी रोड शो दरम्यान ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी आदित्य ठाकरेंची मुलाखत घेण्यासाठी स्टेजवर गेले असता अचानक स्टेज कोसळला. या घटनेत आदित्य ठाकरेंना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली असून यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसंच घटना घडली तेव्हा स्टेजवर चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी 'रोड शो' : महाविकास आघाडी तर्फे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर खैरे यांच्या प्रचारार्थ आज क्रांतीचौक ते संस्थान गणपती असा रोड शो काढण्यात आला. एका पिकअप गाडीत नेते मंडळी उभे राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. क्रांतीचौक भागातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन यावेळी खैरे यांनी केलं. ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडत वातावरण निर्मिती या निमित्तानं करण्यात आली. यावेळी विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी नेत्यांची मुलाखत घेत होते. त्याचवेळी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे मुलाखत घेत असताना अचानक गाडीतला स्टेज कोसळला. त्यानंतर सर्व नेतेमंडळी एकमेकांना सावरत गाडी खाली उतरले. या घटनेत सर्वांनाच किरकोळ दुखापत झाली.
आदित्य ठाकरे यांची टीका : रोड शो च्या अगोदर आदित्य ठाकरेंची सभा पार पडली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच देशातील जनशक्ती इंडिया आघाडी बरोबर आहे, आणि ही शक्ती तुम्हाला चार जूनला देखील दिसेल. शिंदेंची शिवसेना नाही तर गद्दार गट असून शिंदे सारखा व्यक्ती मी अजून पाहिलेला नाहीये. ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
हेही वाचा -