मुंबई Aaditya Thackeray : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना, आत्तापासूनच राजकीय पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, ते महाराष्ट्र पिंजून काढत असताना, दुसरीकडं त्यांचे पुत्र, आमदार तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत निवडणुकीचे वातावरणनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवडी मतदारसंघातील लालबागमध्ये आज (17 फेब्रुवारी) आदित्य ठाकरे जाहीर सभा घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कदाचित ते या मतदारसंघातून निवडणूक देखील लढवू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळं त्यांची आजची सभा महत्त्वाची मानली जाते.
'महानिष्ठा, महान्याय' महाराष्ट्र : 'महानिष्ठा, महान्याय' महाराष्ट्र आता आपलाच झंजावात, संपूर्ण महाराष्ट्रात! अशी यात्रा आमदार आदित्य ठाकरे काढत आहेत. याच यात्रेचा एक भाग म्हणून आदित्य ठाकरे हे आज लालबागमध्ये सायंकाळी जाहीर सभा घेता आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक भागात आदित्य ठाकरे 'महानिष्ठा, महान्याय' या यात्रेच्या माध्यमातून सभा घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथे सभा घेतल्या या सभेतून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यामुळं आदित्य ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर या सभेच्या निमित्तानं ठाकरे गटाकडून वेगळी चाचपणी होत असल्याचं बोललं जातय.
कसा आहे शिवडी मतदारसंघ : शिवडी मतदारसंघात शिवडी, काळा चौकी, लागबाग, परळ, डिलाईल रोड (एक साईड) असे विभाग येतात. मुख्यत: येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात गिरणी असल्यामुळं या विभागाला गिरणगाव असंही संबोधलं जातं. मराठीबहुल वस्ती मोठी असल्यामुळं बारा महिने सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सवांचे वातावरण असते. शिवडी मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेला मतदारसंघ समजला जातो. बीआयटी, बीडीडी चाळींपासून ते भोईवाडा, रामटेकडी, आंबेवाडी यासारख्या झोपडपट्ट्यांपर्यंत आणि टोलेजंग इमारती असं वैविध्य येथे पाहायला मिळतं. प्रसिद्ध लालबागचा राजा, तेजुकायाचा गणपती, गणेश गल्ली याच मतदारसंघात येतात. या मतदारसंघातील खासदार, दोन आमदार आणि पाचही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. (शिवसेना पक्ष फुटीच्या आधी) दरम्यान, मराठी वस्तीशिवाय शिवडी परिसरात दलित, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासह तेलुगु असा संमिश्र लोकवस्तीचा परिसर आहे. तसंच याच मतदारसंघातून शिवडी-न्हावाशेवा मार्ग जातो, के.ई.एम., वाडिया, टाटा कॅन्सर, टीबी हॉस्पिटल यांचाही यात समावेश आहे.
ठाकरे गटासाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ : ठाकरे गटासाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. मात्र हा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपा पेटून उठला आहे. या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपामध्ये कडवी लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इथं सध्या शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार अजय चौधरी हे आमदार आहेत. तर त्यांचेच अरविंद सावंत हे खासदार आहेत. मात्र, शिवसेना फुटीनंतर चित्र बदललं असल्यामुळं मतदारांची विभागणी झाली आहे. परिणामी याचा फटका शिवसेना (ठाकरे गटाला) बसू शकतो. असंही जाणकार आणि राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
शिवडी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला : 1980च्या दशकात काँग्रेसचे सतीश पेडणेकर आणि त्यानंतर कामगार आघाडीचे शरद खातू हे 2 आमदार सोडले तर सातत्याने या मतदारसंघावर शिवसेनेचंच वर्चस्व राहिलं आहे. तसंच 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे दगडू सकपाळ निवडून आले. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दगडू सकपाळांचा पराभव केला. या निवडणुकीत दगडू सकपाळ यांचा 7 हजार मतांनी पराभव झाला होता. 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अजय चौधरी यांनी मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव केला. तर मागील 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अजय चौधरी विजयी झाले. त्यामुळं शिवडी मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो.
आदित्य ठाकरे येथून निवडणूक लढवणार : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी चाचपणीही केली होती. मात्र, त्यांनी आमदार सुनील शिंदेंच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली. मागील काही निवडणुकींचा विचार केल्यास येथे शिवसेनेच्या उमेदवाराला 49 टक्के मतं मिळाली होती. तर अन्य पक्षातील उमेदवारांची एकत्रित मतं 45 टक्के आहेत. त्यामुळं आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सुरक्षित समजला जातोय. कारण वरळी मतदारसंघात गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून येथे पाय रोवत आहे. वरळीत मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी याआधीच भाजपाने कंबर कसली आहे. त्यामुळं कदाचित दूरदृष्टीचा विचार करुन वरळी मतदारसंघात ठाकरे गटाचा पराभव होऊ शकतो, याची भीती वाटत असावी. याकरता आदित्य ठाकरेंसाठी पर्याय म्हणून सुरक्षित शिवडी मतदारसंघाची निवड केली जाऊ शकते. याच्याच तयारीचा एक भाग म्हणून चाचपणी केली जात आहे. त्यामुळंच आज आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातील लालबाग येथे जाहीर सभा घेत आहेत.
गुन्हेगारी आणि राजकीय हत्या : शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे नगरसेवक विनायक वाबळे यांची राजकीय वैमनस्यातून झालेली हत्या. याशिवाय कम्युनिस्ट पार्टीचे कृष्णा देसाई, आमदार विठ्ठल चव्हाण, ठाकरे गटाचे उप विभागप्रमुख सुभाष डामरे यांच्याही हत्या या मतदारसंघात झाल्या आहेत. सुरेश मंचेकर, गुरू साटम, यांच्या टोळ्यांचा येथील राजकारणावर काही काळ प्रभाव होता. तसंच ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि माजी आमदार दगडू सकपाळ अशाच एका हल्ल्यात जखमी झाले होते. अशी स्थित्यंतरं या मतदारसंघात होत असताना, ठाकरे गटानं आपली ताकद वाढवली आहे.
शिवडी मतदारसंघावर त्यांचा डोळा-शिंदे गट : आदित्य ठाकरे यांची यात्रेतील पहिलीच सभा नाशिकमध्ये होती. मात्र, लोकांकडून येथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं ती सभा फेल गेली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवडी मतदारसंघातील लालबाग येथे सभा घेत आहेत. ठाकरे गटाची हिंदुत्वावरील न्याय आणि निष्ठा केव्हाच गेली आहे. मात्र, त्यांनी यात्रेला नाव ठेवले. न्याय आणि निष्ठा हे हास्यास्पद असल्याची टीका शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत यांनी केली आहे. "आता ते आपला वरळी हा मतदारसंघ सोडून शिवडी या मतदारसंघात सभा घेत आहेत. वरळी मतदारसंघात त्यांनी दोन माणसांचीही कामं केली नाहीत किंवा दोन माणसांनाही ते न्याय मिळवून देऊ शकले नाहीत. आता शिवडी मतदार संघावर त्यांचा डोळा आहे. तेथील आमदारांना बाजूला करायचं आणि हा सुरक्षित मतदारसंघ असल्यानं इथून निवडणूक लढवण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव आहे", असा आरोप अरुण सावंत यांनी केला आहे.
...तर वरळीतून अधिक मतांनी निवडून आणू : दुसरीकडे वरळी मतदारसंघातील पूर्वीचे आमदार आणि आताचे विधान परिषदेवरील शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार सुनील शिंदे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, "जरी शिवडी मतदारसंघ सुरक्षित असला तरी त्यापेक्षाही वरळी मतदारसंघ सुरक्षित आहे. आदित्य ठाकरे यात्रेच्या निमित्तानं लालबाग येथे जाहीर सभा घेत आहेत. कोणताही हेतू ठेवून ते सभा घेत नाहीत किंवा निवडणूक लढवायची आहे, म्हणूनही सभा घेत नाहीत. पण असं जर विरोधक आरोप करत असतील तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना मागच्या निवडणुकीतील मतांपेक्षा अधिक मतांनी आम्ही निवडून आणू", असा विश्वासही सुनील शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील 3 निवडणुकीत कसे आहे पक्षीय बलाबल?
सन 2009 विधानसभा निवडणूक -
बाळा नांदगावकर मनसे 64 हजार 375
दगडूदादा सकपाळ, शिवसेना 57, 912
स्मिता चौधरी, काँग्रेस 15, 431
सन 2014 विधानसभा -
अजय चौधरी, शिवसेना 72, 464
बाळा नांदगावकर, मनसे 30, 553
शलाका साळवी, भाजपा 21, 921
मनोज जामसुतकर, काँग्रेस 12, 732
नंदकुमार काटकर, राष्ट्रवादी 5, 269
सन 2019 विधानसभा -
अजय चौधरी, शिवसेना 77,687
बाळा नांदगावकर, मनसे 38, 350
उदय पाहनसेकर, काँग्रेस 13, 368
हेही वाचा -