मुंबई Aaditya Thackeray On Mahayuti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा काढण्यात आलीय. ही यात्रा आज (18 ऑगस्ट) जुन्नरमध्ये पोहोचली. यात्रेनिमित्त अजित पवारदेखील जुन्नरमध्ये दाखल झाले होते. मात्र, या ठिकाणी अजित पवारांना महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या निषेधाला सामोरं जावं लागलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, यावरुन आता शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केलीय.
काय म्हणाले आदित्य ठाकरे? : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्या महाविकास आघाडीला महायुती आणि खासकरुन भाजपाकडून ट्रोल करण्यात येतंय. परंतु, आम्ही चांगले आहोत की वाईट याचं सर्टिफिकेट देणारे भाजपा कोण? भाजपाला काय बोलायचं ते बोलू द्या. अजित पवारांच्या सन्मान यात्रेत भाजपाकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. यांच्यात ऑल ईज वेल आहे का? एक सीएम आणि दोन हाफ सीएम यांच्यात कुठंही ताळमेळ दिसत नाही." "तसंच एकमेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेनं चालणाऱ्या लोकांचं काय होऊ शकतं, हे यातून दिसतंय", असा टोलाही त्यांनी लगावला.
होर्डिंगबाबत एक पॉलिसी आणणार : पुढं ते म्हणाले की, "कोस्टल रोडच्या कामाची डेडलाईन डिसेंबर 2023 होती. परंतु, या सरकारनं कामात दिरंगाई केली. या सरकारला फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर दिसतोय. होर्डिंगच्या माध्यमातून पैसा लाटला जातोय. मात्र, नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यानंतर कोस्टल रोडच्या आसपास कुठंही तुम्हाला होर्डिंग दिसणार नाही. त्यासाठी आम्ही पॉलिसी आणणार आहोत", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
निवडणुका लांबणीवर जातील : "पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' एकच होती. परंतु, आता आंध्र प्रदेश आणि बिहार यांचाही आवाज मन की बातमधून ऐकायला मिळतोय," असा टोला आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. "पालिकेच्या निवडणुका कित्येक महिन्यापासून रखडल्या आहेत. आता राज्यातील विधानसभा निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरलंय. त्यामुळं निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात, अशी शक्यता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर आदित्य ठाकरेंचा संताप; दिला 'हा' इशारा - Aaditya Thackeray Mumbai PC
- धारावी पुनर्विकासात मदर डेअरीच्या जागेवरून वाद: आदित्य ठाकरे वर्षा गायकवाड यांनी दिली भेट - Dharavi Redevelopment Project