नवी दिल्ली India Develop Port In Sri Lanka : श्रीलंका देश सध्या आर्थिक आरिष्ठांमधून जात आहे. त्यामुळे भारतानं श्रीलंकेतील तीन बेटांचा विकास करण्यासाठी निधी दिला होता. त्यानंतर आता पुन्हा भारतानं कानकेसंथुराई ( KKS ) बंदर विकसित करण्यासाठी श्रीलंकेला 61.5 मिलियन डॉलर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेचे बंदरं जहाजबांधणी आणि विमान वाहतूक मंत्री निमल सिरिपाला डी सिल्वा आणि भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदरात उभारल्या जाणार या सुविधा : समुद्रात येणाऱ्या लाटा आणि भरती ओहोटी लक्षात घेऊन कानकेसंथुराई ( KKS ) या बंदरात विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठ्या लाटा आणि वादळांपासून संरक्षण करण्यासाठी कायमस्वरुपी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. बंदर 30 मीटर खोलीपर्यंत ड्रेज केलं जाणार आहे. त्यामुळे डीप ड्राफ्ट जहाज तिथ लावता येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
श्रीलंका मंत्र्यांनी केली कृतज्ञता व्यक्त : श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्यावर वचनबद्धता व्यक्त केली. श्रीलंकेत अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं वचन दिलं. भारत सरकारनं श्रीलंकेला सर्वोच्च पर्यटनस्थळ म्हणून नियुक्त केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर श्रीलंकेचे मंत्री मंत्री निमल सिरिपाला डी सिल्वा यांनी भारत सरकारनं केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चेन्नई आणि जाफना या दोन शहरांमध्ये विमान वाहतूक सुरू केल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
भारतीय पर्यटकांच्या सोयीसाठी बंदरावर नवीन टर्मिनल : मागील नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली आहे. यात कानकेसंथुराई ( KKS ) या बंदराला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे भारतीय पर्यटकांच्या सोयीसाठी कानकेसंथुराई ( KKS ) बंदरावर 600 दशलक्ष रुपयाचं नवीन टर्मिनल बाधण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीलंकन मंत्री निमल सिरिपाला डी सिल्वा यांनी दिली. कानकेसंथुराई ( KKS ) बंदर हे श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रदेशात असून ते 16 एकर क्षेत्रावर पसरलं आहे. कानकेसंथुराई ( KKS ) हे बंदर भारताच्या पाँडिचेरी इथल्या काराईकल बंदरापासून 56 नॉटिकल मैल अंतरावर आहे.
हेही वाचा :