ओटावा Hardeep Singh Nijjar Murder Case : कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याचा दावा केला आहे. या तीन मारेकऱ्यांनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली असून ते भारतीय असल्याचंही कॅनडा पोलिसांनी स्पष्ट केलं. करणप्रीत सिंग कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावं असल्याचं कॅनडा पोलिसांनी स्पष्ट केलं. या पकडण्यात आलेल्या आरोपींची फोटोही कॅनडा पोलिसांनी प्रसिद्ध केली. या तिघांना अल्बर्टाच्या एडमंटन शहरातून अटक करण्यात आल्याची माहिती कॅनडा पोलिसांनी दिली आहे.
हरदीप सिंग निज्जरचे मारेकरी पकडल्याचा दावा : कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या करणाऱ्या आरोपींना 3 मे रोजी अटक करण्यात आल्याची माहिती कॅनडा पोलिसांनी दिली. या तीन आरोपींना सरेच्या RCMP इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) नं शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. ब्रिटीश कोलंबिया, अल्बर्टा आरसीएमपी आणि एडमंटन पोलीस यांच्या संयुक्त पथकानं 3 मे रोजी सकाळी ही कारवाई केली, अशी माहिती दिली.
पोलिसांनी जारी केली तीन आरोपींची छायाचित्रं : कॅनडा पोलिसांनी हरदीप सिंग निज्जर याच्या मारेकऱ्यांची छायाचित्रं जारी केली. या तीन आरोपींनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी सरे आणि आसपास जी कार वापरली होती, त्या कारचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत हरदीप सिंगच्या हत्येविषयीची माहिती आरसीएमपीचे सहायक आयुक्त डेव्हिड तेबोल यांनी दिली. तेबोल म्हणाले, "हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन संशयित मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. आम्ही पुराव्याच्या बाबत भाष्य करू शकत नाही. हरदीप सिंग निज्जर याची हत्या मारेकऱ्यांनी का केली, याबाबतही बोलणार नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 'इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही कॅनडामधील अनेक प्रकरणात काम केलं. या प्रकरणाच्या तपासात सरे आरसीएमपी, अल्बर्टा आरसीएमपी आणि इतरांचा समावेश आहे."
हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या : कुख्यात खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याची 18 जून 2023 रोजी सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वारामधून दर्शन घेऊन घरी परतत असताना हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ऑगस्ट महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी तिथल्या संसदेत हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केला. मात्र कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपामुळे कॅनडा आणि भारताचे संबंध तणावपूर्ण बनले. भारतानं पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे आरोप फेटाळले होते.
हेही वाचा :
- India Canada Row : ट्रूडोचे आरोप 'राजकीयदृष्ट्या प्रेरित', कॅनडातील सुरक्षा परिस्थितीमुळं व्हिसा सेवा बंद
- Temple Vandalize In Canada : कॅनडात हिंदू मंदिरांची तोडफोड थांबेना; खलिस्तान समर्थकांनी आणखी एका मंदिरावर केला हल्ला
- India Canada Row : 'भारतात तुमच्या जीवाला धोका, सावधगिरी बाळगा'; कॅनडानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अॅडव्हायजरी