मॉस्को Firing in Concert Hall of Moscow : रशियाची राजधानी मॉस्कोतील एका कॉन्सर्ट हॉलवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याचे कपडे घातलेले 5 दहशतवादी हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली. या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत. ही घटना रशियाच्या राजधानीच्या पश्चिमेला असलेल्या क्रोकस सिटी हॉलमध्ये घडली. इस्लामिक स्टेट या संघटनेनं (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय.
घटनास्थळी 70 हून अधिक रुग्णवाहिका : याठिकाणी हल्ल्यानंतर कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागल्याचंही वृत्त स्थानिक मीडियानं दिलंय. त्याचवेळी रशियन तपास यंत्रणेनं या गोळीबाराची चौकशी सुरु केलीय. गोळीबाराची माहिती मिळताच रशियन लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली. कॉन्सर्ट हॉलमध्ये शेकडो लोक अडकल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 70 हून अधिक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. रशियन मीडियानुसार हॉलमध्ये बॉम्बही फेकण्यात आले आहेत. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमेरिकेनं आधीच दिला होता इशारा : मॉस्कोच्या राज्यपालांनी याबाबत सांगितलं की, "क्रोकस सिटी हॉलजवळ 70 हून अधिक रुग्णवाहिका उपस्थित आहेत. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचे मृतदेहही बाहेर काढले जात आहेत. परिस्थिती पाहता मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात येणारा सोहळा तूर्तास पुढं ढकलण्यात आलाय. अमेरिकन दूतावासानं आधीच इशारा दिला होता ज्यात 'अतिरेकी' मॉस्कोत मोठी दहशतवादी घटना घडवण्याचा कट करत असल्याचं सांगण्यात आलं होतं."
कार्यक्रमादरम्यान अंदाधुंद गोळीबार : प्राप्त माहितीनुसार कॉन्सर्ट हॉलमध्ये 'पिकनिक म्युझिक' बँडचा शो सुरु असताना हा गोळीबार झाला. या हॉलची सर्व तिकिटे विकली गेली. अंदाजे 6 हजारांहून अधिक प्रेक्षक तिथं उपस्थित असल्याचं सांगण्यात येतंय. रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा रक्षकाला लक्ष्य केलं, नंतर हॉलचे दरवाजे बंद केले आणि अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यानंतर आग लावली, त्यामुळं सभागृहाचं मोठं नुकसान झालंय.
हेही वाचा :