हैदराबाद Varicose Veins Problems : व्हेरिकोज व्हेन्स ही नसांशी संबंधित एक गंभीर समस्या आहे. यामध्ये पायाच्या शिरा निळ्या किंवा जांभळ्या तसंच जाड किंवा फुगल्यासारख्या दिसू लागतात. बहुतेक प्रकरणांमध्ये ही समस्या पायांमध्ये दिसून येते आणि पीडित व्यक्तीच्या पायांमध्ये वेदना आणि अस्वस्थता निर्माण होते. ही समस्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा सुजल्यामुळे उद्भवते. यामध्ये नसांचे व्हॉल्व्ह सुरळीत काम करत नाहीत. परिणामी हृदयाकडे जाणारं रक्त परत येतं आणि शिरांमध्ये जमा होतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. जगभरातील जवळपास 60 टक्के महिला व्हॅरिकोज व्हेन्सच्या समस्येनं त्रस्त आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी लवकरात लवकर उपचार करावेत, असं डॉक्टर सांगतात.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय : डॉ. प्रकाश दीप सिंग, जनरल सर्जन, नवी दिल्ली यांच्या मते व्हेरिकोज व्हेन्स, याला मराठीत 'अपस्फत नीला' असंही म्हणतात. मुख्यतः रक्ताभिसरणातील अडथळ्यामुळे ही समस्या उद्भवते. खरं तर, जर नसांचे व्हॉल्व्ह कमकुवत झाले किंवा नीट काम करत नसतील तर रक्ताभिसरण होण्याऐवजी रक्त रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं. यामुळे शिरा सुजतात, जाड होतात, फुगतात आणि काहीवेळा निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या दिसतात. ही समस्या प्रामुख्यानं पायांच्या वेगवेगळ्या भागात दिसून येते.
व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येची कारणं : व्हेरिकोज व्हेन्सची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे
- दीर्घकाळ उभं राहणं किंवा बसणं यामुळे नसांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. परिणामी व्हेरिकोज व्हेन्सची समस्या होवू शकते.
- काही प्रमाणात हे अनुवांशिक सुद्धा आहे. कुटुंबातील एखाद्याला व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असेल तर, दुसऱ्यांनाही ती समस्या होण्याची शक्यता असते.
- जास्त वजनामुळे मज्जातंतूंवर अतिरिक्त दबाव पडतो, त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.
- गर्भधारणेदरम्यान देखील ही समस्या होऊ शकते. तसंच शरीरातील हार्मोनल बदल आणि वजन वाढल्यानं नसांवर दबाव वाढतो.
- वाढत्या वयानुसार ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार : व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येवर योग्यवेळी उपचार केल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येतं. या समस्येवर उपचार करताना तिचं किती गंभीर स्वरुप आहे त्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, सौम्य प्रकरणांमध्ये औषधं आणि व्यायाम उपयुक्त आहे. परंतु जर समस्या गंभीर असेल तर डॉक्टर स्क्लेरोथेरपी, लेझर उपचार किंवा आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांची शिफारस करू शकतात. याशिवाय या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं अत्यंत आवश्यक आहे.
खबरदारी : उपचार आणि औषधांव्यतिरिक्त, काही खबरदारी घेणं उपयुक्त ठरू शकते. ते खालीलप्रमाणे
- जीवनशैलीत बदल : व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येवर उपाय म्हणून प्रथम जीवनशैलीत बदल करणं महत्त्वाचं आहे. जास्त वेळ उभं राहणं किंवा बसणं टाळा. जर तुमच्या कामासाठी तुम्हाला जास्त वेळ उभं राहावं लागत असेल तर त्यादरम्यान थोडा वेळ बसा. त्याचप्रमाणे जास्त वेळ बसून काम करत असाल तर ठराविक वेळानंतर थोडे पाय मोकळे करुन या.
- वजन नियंत्रणात ठेवा : वजन कमी केल्यानं पायांवरचा दबाव कमी होतो. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येपासून आराम मिळतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रित राहतं.
- व्यायाम : चालणं, पोहणं आणि सायकल चालवणं यासारख्या नियमित व्यायामामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात आणि व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्येपासून आराम मिळतो.
- कॉम्प्रेशन सॉक्स घाला : कॉम्प्रेशन सॉक्स हे विशेष प्रकारचे मोजे आहेत. जे नसांवर दबाव आणतात आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसंच सूज आणि वेदना कमी होतात.
- पाय उंच करून आराम करा : दिवसभरात काही वेळ पाय उंच करून आराम करा. त्यामुळे शिरांमध्ये जमा झालेलं रक्त खालच्या दिशेनं वाहतं आणि सूज कमी होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)