हैदराबाद Weight Gain Causes in Women : बैठी जीवनशैली आणि अनहेल्दी डाएटमुळे अनेकांचे वजन वाढत आहे. लठ्ठपणा जणू एक प्रकारचा आजारच होत चालला आहे. अनेकांचं वजन झपट्यानं वाढतं परंतु कमी करण्यासाठी विविध उपाय करून देखील ते कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी अनेकांच्या नाकी नऊ येतात. हल्ली कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक महिलांचं वजन वाढत आहे. ज्येष्ठ फिजिशयन यांच्या मते, महिलांचं वजन वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. बहुतांश वेळा महिलांमधील हार्मोनल चेंजेंस आणि इतर आजारांमुळे देखील वजन वाढते.
महिलांचं वजन वाढण्यामागं ही आहेत कारणं
- थायरॉईडच्या समस्या : दिवसेंदिवस महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढत आहे. थायरॉइडचे दोन प्रकार आहेत. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. हायपोथायरॉईडीझम असल्यास महिलांचं वजन झपाट्यानं वाढतं. थायरॉईडचं संप्रेरक चयापचय नियंत्रित करतं. शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात हा हार्मोन रिलिज झाल्यानं वजन वाढणं, चयापचय कमी होणं यासारख्या समस्या निर्माण होतात.
- कुशिंग सिंड्रोम : कुशिंग सिंड्रोममुळेही जास्त वजन वाढू शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मूत्रपिंडांवरील अधिवृक्क ग्रंथी कॉर्टिसॉल हार्मोनची जास्त प्रमाणात निर्मिती करतात तेव्हा ही समस्या उद्भवते. आपल्या देशात याचं प्रमाण कमी असंल तरी पाश्चिमात्य देशांमध्ये ते अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
- वजन वाढण्यामागे निद्रानाश : महिलांचं वजन वाढण्यामागं निद्रानाश हे एक कारण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ज्या महिला रात्री सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांच्या शरीरात चरबी जास्त असते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि इन्सुलिन हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. परिणामी वजन वाढते. भुकेला कारणीभूत असणारे हार्मोन्स देखील गोंधळून जाऊ शकतात आणि जास्त खाण्यास कारणीभूत ठरतात.
- तणाव आणि नैराश्य: असं म्हटलं जातं की, मानसिक तणाव आणि नैराश्यामुळेही देखील वजन वाढतं. नैराश्यामुळे हार्मोन्स जास्त तयार होतात आणि त्यामुळे भूक वाढते. हे वजन वाढण्यास कारणीभूत आहे. तसंच व्यायामाच्या अभावामुळे देखील वजन वाढतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- PCOS आणि रजोनिवृत्ती: हार्मोनल असंतुलनामुळे PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) होतो. पीसीओडी आणि पीसीओएसची समस्या असलेल्या महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता असते. तसंच रजोनिवृत्ती दरम्यान देखील वजन वाढणे शक्य आहे. हार्मोन्स कमी झाल्यामुळे चयापचय मंदावतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)