Maharashtrian Thalipeeth: आपण खवय्ये आणि सोबतच हेल्थ कॅाशिअस असाल तर आरोग्यास उपयुक्त एका चवदार पदार्थाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. थालीपीठ हा एक पौष्टिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. बहुतांश लोकांच्या न्याहारीमध्ये थालीपीठचा समावेश असतो. थालीपीठ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकही आहे. हा पदार्थ अनेक प्रकारच्या धान्यांपासून तयार करण्यात येतो. यामध्ये बाजरी, ज्वारी, गहू, बेसन, तांदूळ तसचं विविध भाज्यांचा समावेश असतो. मल्टिग्रेन पिठाने बनवलेलं थालीपीठ रुचकर तर असतं परंतु आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया थालीपीठ बनवण्याची पद्धत
तज्ज्ञ काय म्हणतात?
''बाजरीचे थाळीपीठ थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यास सर्वोत्तम आहे. बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरचं चांगलं प्रमाण असतं. त्यामुळे कोलेस्ट्रोलची पातळी कमी होवू शकते. बाजरीमध्ये प्रोटीनची मात्रा मुबलक प्रमाणात असते त्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. यात असलेल्या मॅग्नेशियमुळे पित्त कमी होण्यास मदत होते. तसंच विविध भाज्या जसे की, मेथी, पालक, आंबाडी यासारख्या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तसंच डायबिटीजच्या रुग्णांना देखील ज्वारी खाणं फायदेशीर आहे. ज्वारीचं थाळीपीठ नास्त्यामध्ये घेतल्यानं चांगले फायदे होतात, असं आहारतज्ज्ञ डॉ. रेनुका माइंदे यांनी सांगितलं आहे.''
थालीपीठचे प्रकार
- पोहे आणि बटाटा थालीपीठ
- मिक्स मल्टिग्रेन थालीपीठ
- दुधीचे थालीपीठ
- मेथी थालीपीठ
- काकडी थालीपीठ
- कोबी थालीपीठ
- पालक थालीपीठ
मल्टिग्रेन थालीपीठ रेसिपी
साहित्य
ज्वारीचे पीठ 1 कप, तांदूळ पीठ 1 कप, बेसन 1 कप, बाजरीचं पीठ 1 कप, ओवा 1 टी स्पून,धने 1 टी स्पून, बारीक चिरलेला,कांदा 1,जिरेपूड 1 टीस्पून,हळद 1 टीस्पून,हिरवी मिरची 3 नग,आलं,चवीनुसार मीठ,लसून पाकळ्या 5-6,कोथिंबीर,अजवाइन 1 टीस्पून,तीळ 1 टीस्पून, गरजेनुसार पाणी
पद्धत
- एक मोठं बाऊल घ्या. त्यात ज्वारीचं पीठ, बेसन, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ घालून एकत्रित करुन घ्या. ही सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, लसून, हिरवी मिरची, तीळ, अजवाइन, ठेचलेलं धनेपूड, जिरेपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून पीठ चांगलं मिसळून घ्या.
- पिठात थोडं-थोडं पाणी घाला आणि मऊ ते मळून घ्या.
- पिठाला काही वेळ मॅरिनेशनसाठी ठेवा.
- अर्ध्या तासानांतर पिठाचे लहान लहान गोळे करुन घ्या.
- एक कॉटनचा रुमाल घेऊन त्याला पाणी लावून किंचित ओलं करा.
- त्यानंतर यावार पिठाचा गोळा ठेऊन मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घ्या.
- तवा गरम करा आणि त्यावर थोडं तेल ओता आणि तेल चांगलं गरम होवू द्या.
- थापून झालेलं थालीपीठ आता गरम तव्यावर घ्याला.
- थालीपीठावर तेल सोडून दोन्ही बाजूनं व्यवस्थित भाजून घ्या. झालं तुमचा थालीपीठ तयार.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)