हैदराबाद Avoidable Walking Mistakes : पायी चालणं ही आपली दररोजची नैसर्गिक क्रिया आहे. मात्र, चालण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे माहीत नसल्यामुळे आपण चालणं टाळतो. परंतु तुम्ही सकाळी केवळ 20 ते 30 मिनिटं चाललात, तर ते फायदेशीर ठरू शकते. शरीरातील कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल बर्न करण्यासाठी यापेक्षा सोपा व्यायाम कोणताच नाही. यामुळे तुमचं वजन तर कमी होतेच, परंतु तुम्ही अनेक आजारांना दूर पळवून लावू शकता. डॉक्टरांच्या मते, सकाळची ताजी हवा फुफ्फुसातील रक्त शुद्ध करण्यास मदत करते. तर, तिच शुद्ध हवा घेत दररोज किमान 3 किलोमीटर चालण्याचा सल्ला प्रसिद्ध योगसाधक संगीता अंकथा (Sangeetha Ankatha) यांनी दिलाय. चालण्याचा उत्तम फायदा व्हावा, म्हणून चालताना कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहुयात.
चालताना 'या' करू नका चुका : बरेच लोकं चालताना इतरांशी बोलण्यात आपला सर्व वेळ वाया घालतात. तासभर जरी फिरायला गेले, तरी धड 10 मिनिटं देखील नीट चालत नाहीत. यामुळे त्यांना फायदा होत नाही. काही लोक सुट्टी असेल तेव्हा म्हणजे शनिवार आणि रविवारी लांब अंतर चालतात. परंतु जास्त चालल्यामुळे शरीर थकतं. त्यानंतर पुरेशी विश्रांती न दिल्यास शरीराला हानी पोहोचू शकते. तुम्ही तीन मिनिटं वेगानं चालत असाल, तर तीन मिनिटं हळू चालत जा. असं केल्यानं शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.
लयबद्ध चाला : योगसाधक संगीता अंकथा यांच्या मते, चालताना हात लयबद्ध पद्धतीनं हलले पाहिजे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही डाव्या पायानं पाऊल पुढं टाकलं तर उजवा हात पुढं सरकवावा. त्याचप्रमाणं, जेव्हा तुम्ही तुमच्या उजव्या पायानं चालत असाल, तेव्हा तुम्ही तुमचा डावा हात पुढं करा. असं केल्यानं हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
चालताना करु नये फोनचा वापर : अनेकदा आपण फिरत असताना फोनचा वापर करतो. सोशल मीडिया पाहण्यात आणि चॅटिंगमध्ये आपण व्यस्त असतो. यामुळे आजू-बाजूच्या वातावरणाकडं आपलं लक्ष नसतं. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. मित्र, जोडीदार, कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाणं खूप रोमांचक मानलं जाते. जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील, तर त्यांना सोबत घेऊन जाण्याची शिफारस तज्ज्ञानी केली आहे.
ही खबरदारी आवश्यक आहे :
- मॉर्निंग वॉकला जाताना नेहमी सुती कपडे घालावित.
- घट्ट किंवा फार सैल कपडे टाळावे.
- चालताना पायाची बोटं पूर्णपणे झाकली असावित.
- तुमच्या पायात बसणारे आणि चालायला सोयीस्कर शूज घालावेत.
- घाम शोषणारे मोजे घालणं अति उत्तम
- एकाच वाटेवर फिरण्यापेक्षा वेळोवेळी मार्ग बदलला पाहिजे.
- शक्यतो इअरफोन लावू नये.
- पावसाळ्यात छत्री, रेनकोट घालावेत आणि उन्हाळ्यात टोपी आणि चष्मा घालावा.
- चालताना अनावश्यक गोष्टींचा विचार करू नये.
- कामाचं असं नियोजन करा जेणेकरुन फिरायला जाण्यास गॅप पडणार नाही.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )