मुंबई - Stree 2 Trailer : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर त्यांच्या 'स्त्री' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल घेऊन परतले आहेत. या वर्षातील सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'स्त्री 2' चा ट्रेलर गुरुवारी लॉन्च करण्यात आला. यामध्ये मध्य प्रदेशातील चंदेरी येथील स्त्रीनं मनोरंजनासाठी आणि सुरक्षिततेसाठी परत येण्याचं आश्वासन दिलं आहे.
या मनोरंजक जगतात पडद्यावरील ही प्रतिष्ठित 'स्त्री' पुरुषांच्या हृदयात धडकी भरवताना दिसत आहे. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रद्ध कपूरनं ट्रेलर शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "हा आहे ट्रेलर! भारताची सर्वात प्रतीक्षित 'चंदेरी गँग'ची दहशत या चित्रपटातून परत आली आहे. वर्षातील सर्वात मोठ्या हॉरर-कॉमेडी चित्रपटासाठी सज्ज व्हा. 'स्त्री 2' ट्रेलर आऊट . 15 ऑगस्ट 2024 रोजी या स्वातंत्र्यदिनी ही दंतकथा परत येत आहे."
स्त्री सिक्वेलचा ट्रेलर पहिला भाग जिथे संपला होता त्या कथेपासून सुरू होते. पहिल्या भागाच्या शेवटी श्रद्धानं चंदेरी गाव सोडल्याचे दाखविण्यात आल्याने आता नवा राक्षस शहरात धुमाकूळ घालण्यासाठी आला आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून 'सरकटा' (केवळ डोके असलेला माणूस) आहे, ज्याने स्त्रीला आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं आणि ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.
चंदेरी हे गाव स्त्रीपासून मुक्त झालं असताना हा 'सरकटा' पुरुष आता गावात फिरतो आणि स्त्रियांना पळवून नेतो. पुन्हा एकदा गावकरी मदतीसाठी राजकुमार आणि त्याच्या टोळीकडे वळतात. श्रध्दा राक्षसाशी लढण्यासाठी परत येते. भय आणि हास्यरसाचा भरपूर वापर यात करण्यात आल्याचं ट्रेलरवरुन कळतं.
सीक्वलची झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या ट्रेलर रिलीजची वाट पाहत होते. ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले: "ओओ स्त्री 15 ऑगस्ट का प्रतीक्षा नहीं हो रहा है." दुसऱ्याने कमेंट दिली: "हा चित्रपट आमच्या अपेक्षांच्या पलीकडे असेल!!"
श्रद्धा आणि राजकुमार व्यतिरिक्त, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि इतर कलाकार 'स्त्री 2' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार आणि श्रद्धा यांचा 'स्त्री 2' हा एक कथा विस्तार आहे. मॅडॉक फिल्म प्रॉडक्शनच्या सिने विश्वाचे, स्त्री ते रुही, भेडिया आणि नुकत्याच रिलीज झालेल्या मुंज्यापर्यंत अनेक चित्रपट आहेत. हा चित्रपट दिनेश विजन यांच्या मालकीच्या मॅडॉक फिल्म्सने बँकरोल केला आहे.
हेही वाचा -